शेअर ट्रेडिंगमध्ये पैशांची गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याला तब्बल १ कोटी ४७ लाख ८० हजार रुपयांचा गंडा

अहिल्यानगर मधील शेअर ट्रेडिंगमध्ये पैशांची गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अहिल्यानगर शहरातील एका व्यापाऱ्याला तब्बल १ कोटी ४७ लाख ८० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहराच्या गंजबाजार भागातील व्यावसायिक वल्लभ बिहारीलाल भराडीया यांना एका अनोळखी व्हॉट्सॲप क्रमांकावरून संपर्क करण्यात आला. जयेश वर्मा असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने आपण शेअर बाजार विषयाचे तज्ज्ञ असल्याचे भासवून भराडीया यांचा विश्वास संपादन केला. कमी कालावधीत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आरोपीने ४ एप्रिल ते १४ मे २०२६ या कालावधीत वेगवेगळ्या बँक खात्यांवरून एकूण १ कोटी ४७ लाख ८० हजार रुपये भराडिया यांच्याकडून भरून घेतले.
काही दिवस उलटूनही कोणताही परतावा न मिळाल्याने आणि मूळ रक्कमही परत न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे भराडीया यांच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी जयेश वर्मा या संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर ढिकले करत आहेत.




