नीता राशीनकर ताईंचा जिवनाचा खडतर प्रवास.तसेच राष्ट्र सेविका समिती उत्तर नगर जिल्हा कार्यवाहीका ताईंशी दिलखुलास गप्पा..
अहिल्यानगर

जन्म घ्यावा आणि तो देश कार्यासाठी अर्पण करावा असे उद्दिष्ट ठेवून जगणारी फार कमी लोक असतात. पण आपल्या या लेखाच्या नायिकेचा जन्म तिने देश कार्यासाठीच घेतला आहे.
श्री.बाबुराव आणि सौ. अहिल्या यांच्या उदरी जन्म घेतलेली कन्या नीता ताई .. आंबेजोगाईत लहानाची मोठी झाली. चार बहिणी आणि एक भाऊ असे बहिण- भावंडांनी भरलेले कुटुंब नीताताईस लाभले. नीताताईचा चौथा क्रमांक अर्थात धाकटी बहीण.
ताई लहानपणापासून धाडसी आणि बिनधास्त स्वभावाची होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या खोलेश्वर विद्यालयात ताईचे शिक्षण पूर्ण झाले. तिने इलेक्ट्रॉनिक्स मधून आयटीआय पूर्ण केले याशिवाय कॉम्प्युटर सायन्स ही केले. काही दिवस व्हिडिओकॉन कंपनीमध्ये तिने नोकरी केली.
शाळेत शिकत असतानाच दैनंदिन शाखा तिच्या शाळेतच भरत. रोजच्या दिवशी तिची शाखेला हजेरी असे. राष्ट्रसेविका समितीचे विचार, ध्येय तिला आवडत असे. मुख्य म्हणजे भगव्या ध्वजाला गुरु मानणे आणि ‘तेजस्वी हिंदु राष्ट्राचे पुनर्निर्माण ‘ हे समितीचे उद्दिष्ट नेहमीच तिला भारावून टाकत असे.
इयत्ता सहावीला असताना तिने 21 दिवसांचा प्रारंभिक वर्ग पूर्ण केला. पुढे नववीला गेली आणि लगेचच 21 दिवसांचा प्रवेश वर्ग तिने पूर्ण केला.समितीची आवड अजून निर्माण झाली. आपला व्यक्तिमत्व विकास होतो आणि आपल्या गुणांना तिथे वाव मिळतो हे तिच्या लक्षात आले. इयत्ता दहावी पास झाली आणि पंधरा दिवसाचा प्रबोध वर्गही तिने पुर्ण केला.
एका बाजूस शिक्षण चालूच होते. व्हिडिओकॉन कंपनीतील नोकरी देखील चालू होती आणि समितीचे कामही.
मुलगी वयात आली की घरात लग्नाचा विषय सुरू होतो. नीता ताईची आई तिला लग्नाविषयी बोलू लागली की ताई विषय टाळून न्यायची.
आपण देशासाठी काहीतरी करावं आणि आपला वेळ देशाला द्यावा. समय दान हे सुद्धा मोठे श्रेष्ठ दान आहे . म्हणून ताईने पूर्ण वेळ प्रचारिका म्हणून जाण्याचे ठरविले. पूर्ण वेळ प्रचारिका म्हणून जाणे याचा अर्थ असा असतो की आपल्या घरापासून आपण एकटीने देश कार्यासाठी बाहेर पडायचे.
संघ विचाराचे एखादे कुटुंब आपल्याला राहण्यासाठी परवानगी देते किंवा एखाद्या शाळेमध्ये आपण राहू शकतो. त्यादरम्यान गृह संपर्क करायचा, शाखा सुरू करायची आणि समितीचे विचार घराघरात पोहोचवायचे.
ताईने एकदा निर्णय घेतला की तो तडीस नेण्याचा तिचा स्वभाव असल्याने ती धाराशिव येथे जिल्हा प्रचारिका म्हणून गेली. तिच्या या निर्णयावर घरातील मंडळी बरीच नाराज होती बरं का. सहाजिक आहे म्हणा, आपलं लेकरू दोन वर्ष आपल्याला भेटणार नाही म्हणजे कोणत्याही आईला वाईट तर वाटणारच.
पण ताई ध्येयाला पेटलेली होती. धाराशिव येथे गेल्यानंतर अनेक ठिकाणी गृह संपर्क केले शाखा सुरू झाल्या. ताईचे वय होते फक्त 21 वर्ष …तो काळ होता गुजरातच्या भूकंपाचा.
2000 सालची गोष्ट असेल. त्यावेळी धाराशिव वरून ताई गुजरातला भूकंपग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी गेली. तिच्या समवेत अजून चार सेविका होत्या. भूकंपग्रस्तांची मानसिकता अतिशय भेदरलेली होती. अशा अवस्थेत त्यांना मानसिक आधार देणे, त्यांच्या समवेत वेळ घालवणे, त्यांचे मन रमावे म्हणून खेळ घेणे असे समाजाभिमुख कार्य ताईने केले. छोट्या छोट्या गावात झोपड्या अन झोपड्या पिंजून काढल्या. त्यावेळी अधून मधून छोटे छोटे भूकंपाचे धक्के देखील जाणवत असत. कधी काय होईल याची भीती सततच मनाला वाटत असे. तिचेही वय लहानच होते शिवाय घरची मंडळी लांब.
घेतले कार्य तडीस नेणे हे समितीचे संस्कार लहानपणापासून तिच्यावर असल्याने ती डगमगली नाही. या दोन वर्षाच्या काळातच तिचा प्रवीण हा वर्ग देखील पूर्ण झाला. आत्तापर्यंत ताई कितीतरी वर्गांवर मुख्य शिक्षिका म्हणून गेली. अगदी हरियाणा पासून ते दिल्ली पर्यंत प्रवास झाले. पूर्ण वेळ प्रचारिकेचे कार्य झाल्यानंतर दोन वर्षाचा कालावधी संपला आणि ती घरी आली.
आता नीता ताईच्या आईने तिच्या लग्नाचं फारच मनावर घेतलं. ताईला वाटत असे की आपण लग्न करू नये पण आईचे मन मोडवेना. 2004 मध्ये तिचा विवाह अहिल्यानगर येथील श्री स्तिमित राशिनकर यांचे समवेत झाला. श्री स्तिमितजी फायनान्स कंपनीमध्ये कार्यरत होते. एकत्र कुटुंब पद्धतीत ताईला रुळायला बराच वेळ गेला. सासरची सगळी मंडळी अतिशय हौशी. ताई अगदी साधी राहत असे. शिवाय ग्रामीण भागातुन एकदम शहरी संस्कृतीच्या वातावरणात रुळायला जरा वेळच लागला. सासरची आर्थिक परिस्थिती जेमतेमच. स्वस्थ बसणे हा ताईचा स्वभावच नव्हता. दिवाळीच्या दरम्यान
आकाशकंदील, रांगोळ्या विकणे, पोळी भाजी सेंटर चालवणे, यासारखी काम ताईने केली. विवाह नंतर एकाच वर्षात ताईच्या उदरी श्रिया जन्मली. आपल्या छोट्या बाळाला सांभाळून नोकरी करणे तिला कठीण झाले. काही दिवसानंतर श्रिया मोठी झाली आणि शाळेत जाऊ लागली.
राधिका इंटरप्राईजेसने दिलेली वृत्तपत्रातली एका टेक्निशियनच्या नोकरीची बातमी तिने वाचली. ती नोकरी होती वॉटर प्युरिफाइड दुरुस्त करण्याची. ताई तिथे मुलाखतीसाठी गेली. तेथील व्यवस्थापक म्हणाले, “हे काम तुम्हाला करणे शक्य नाही कारण लोकांच्या घरी जाऊन ओट्यावर चढून वॉटर प्युरिफाइडचे मशीन खाली काढावे लागते, ते दुरुस्त करून पुन्हा लावून द्यावे लागते. ” व्यवस्थापकांना वाटले हे एका स्त्रीला कसे बरे जमेल ? पण आपली ताई मात्र धीराची होती बरं का! ती म्हणाली मला जमेल. मी करेन. केवढा हा आत्मविश्वास.
दुपारी 12 वाजता श्रिया शाळेत जात त्या वेळेत ताईने राधिका इंटरप्राईजेसची वॉटर पुरिफाइड दुरुस्त करण्याची नोकरी स्वीकारली. खरोखरच ताईला बॅगा उचलून त्या गाडीवर ठेवाव्या लागत , ओट्यावर चढून ते मशीन खाली काढून दुरुस्त करून पुन्हा नीट लावून द्यावं लागत असे.
काही दिवसांनी राधिका इंटरप्राईजेसला गरज होती एखाद्या अशा महिलेची की ती मॅनेजर म्हणून तिथे काम सांभाळेल. अर्थातच नीताताई सारखी व्यक्ती राधिका इंटरप्राईजेसला मिळाली. सुरुवातीला मिळणारे चार ऐवजी आठ हजार मानधन तिला सुरू झाले.
दरम्यान ताईचा समितीशी संपर्क बऱ्यापैकी तुटला होता. मनात सतत समिती घोळत होती. दैनंदिन जीवनात अनेक प्रसंग असे आले की तिला समितीचे संस्कार उपयोगी पडले.
एक दिवस अचानक वृत्तपत्रात तिने वाचले की अखिल भारतीय माजी बौद्धिक प्रमुख माननीय सुशील ताई अभ्यंकर यांचे रावसाहेब पटवर्धन सभागृहामध्ये व्याख्यान आहे.
सुशील ताईंचा तिला बराच सहवास लाभला होता. तिने सुशील ताईंना भेटायला जाण्याची इच्छा यजमानांकडे व्यक्त केली. त्यांनी देखील ती मान्य केली आणि ताईसाठी आनंदाची गोष्ट ही की ताईची माननीय सुशील ताईंशी भेट झाली.
अर्थातच त्यामुळे पुन्हा समितीशी संपर्क झाला.त्यामुळे समिती कार्यास सुरवता झाली. काही दिवस शारीरिक प्रमुख म्हणून तिने दायित्व स्वीकारले. गेली चार ते पाच वर्षापासून तिच्याकडे उत्तर अहिल्यानगरचे जिल्हा कार्यवाहीका म्हणून दायित्व आहे . अत्यंत मनापासून ती काम करताना दिसते. सात तालुक्यांमध्ये प्रवास करण्याची तिची तळमळ असते. सेविकांमधले कला गुण ओळखते.

संसाराची जबाबदारी आली की उदरनिर्वाह आणि जबाबदाऱ्या असतातच. अशा परिस्थितीत सामान्य माणसाला आर्थिक नियोजन करावे लागते. आता तिने अहिल्यानगरातच श्री समर्थ स्वादगृह हा हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. ताई नियोजनाची पक्की आहे त्यामुळे या व्यवसायाची सुद्धा ती उंच भरारी घेईल.त्या सोबतच निता ताई चे श्रेया ड्रेपरीज, साड्या नावाने साईड बिझनेस ही आहे.. ताई कुठल्याच बाबतीत कुठल्याच क्षेत्रात मागे पडली नाही.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अनेक प्रसंग घडतात. त्यातून रस्ते काढावे लागतात. ताई म्हणते, ” जेव्हा जेव्हा मी डगमगते, तेव्हा तेव्हा मला समिती पुन्हा उभा करते. “
आपण समाजाचं देणं लागतो हे सतत ताईच्या मनात असते त्यामुळे राष्ट्रसेविका समितीचे कार्य तिला आजन्म करायचे आहे. तिची कन्या श्रिया मोठी झाली आहे आणि लवकरच ती डॉक्टर होईल. तिच्याही पंखात ताईला बळ दयायचे आहे. कुटुंब सांभाळून समितीचे कार्य ही दोन ध्येय ताईने आपल्या दृष्टीसमोर ठेवली आहे.
‘ स्त्री हा कुटुंबाचा आधार असते.’ हे समितीचे वाक्य नव्याने जोडल्या गेलेल्या सेविकांना ती नेहमीच सांगत असते.
शाखेचे दृढीकरणं , सेविका जोडणे, प्रांताने दिलेले कार्य करणे, आपल्याकडे आलेल्या दायित्वाचे पालन करणे हे सगळं ताई मनापासून स्वीकारते.
ताईच्या समिती कार्याला अनेक शुभेच्छा तिच्याकडून उत्तम देश सेवा होवो आणि तिला चांगले आरोग्य लाभो..
AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल च्या मुख्य संपादिका श्रुती बत्तीन मॅडम नी निता ताई ला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..



