अहिल्यानगरमध्ये दोन स्पोर्ट्स दुकानांवर तोफखाना पोलिसांचा छापा, 2.34 लाखांचा माल जप्त..
अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रस्ता परिसरातील दोन स्पोर्ट्स दुकानांवर तोफखाना पोलिसांनी मंगळवारी (26 मे) टाकलेल्या संयुक्त छाप्यात नामांकित ‘पुमा’ कंपनीच्या नावाने विक्रीस ठेवलेला तब्बल 2 लाख 34 हजार 450 रूपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला.
या कारवाईमुळे शहरातील बनावट ब्रँडेड वस्तूंच्या विक्रीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी ‘पुमा-से’ लिमिटेड कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी महेंद्र सोहनसिंग देवरा (रा. राजस्थान) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कॉपीराईट अॅक्ट कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुमा कंपनीचे बनावट ट्रॅक पॅन्ट, टी-शर्ट, जॅकेट, मोजे, टोपी आणि बनावट टॅग मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती कंपनीच्या प्रतिनिधींना मिळाली होती.
त्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी महेंद्र देवरा व फिल्ड एक्झिक्युटिव्ह साजिद अन्सारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पोलीस मदतीची मागणी केली होती. त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परशुराम दळवी यांच्या पथकाने छापा टाकला.
पहिली कारवाई शिव स्पोर्ट्स अँड शू मॉल येथे करण्यात आली. दुकानात पुमा कंपनीच्या नावाने बनावट ट्रॅक पॅन्ट, टी-शर्ट, जॅकेट व मोजे विक्रीस ठेवलेले आढळले.
पोलिसांनी पंचासमक्ष तपासणी केली असता एकूण एक लाख 90 हजार 850 रूपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला. या दुकानाचा मालक शाहरूख इस्माईल शेख (रा. बाराबाभळी, ता. अहिल्यानगर) असल्याचे समोर आले असून तो सध्या पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुकानात काम करणारा अरबाज राजू बागनाव (वय 23, रा. मुकुंदनगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
यानंतर पोलिसांनी जवळच असलेल्या आर.जी. स्पोर्ट्स अँड शू मॉल येथे छापा टाकला. येथेही पुमा कंपनीच्या नावाचे बनावट ट्रॅक पॅन्ट, टी-शर्ट, जॅकेट, टोपी व बनावट टॅग विक्रीस ठेवलेले आढळून आले.
या कारवाईत 43 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दुकानाचा मालक सौरभ रमेश सुडके (रा. सुडके मळा, बालिकाश्रम रस्ता) असल्याचे निष्पन्न झाले.




