नगरमध्ये नो-पार्किंग कारवाईवरून वाद, महिला कर्मचाऱ्याला मारहाण
अहिल्यानगर

अहिल्यानगर महापालिकेच्या नो-पार्किंग कारवाईदरम्यान उचलून नेलेल्या दुचाकीच्या कारणावरून महिला कर्मचार्यास मारहाण करून त्यांच्या हातातील चलन मशीन फोडल्याची घटना शुक्रवारी (29 मे) सायंकाळी शहरातील टॉपअप पेट्रोलपंप, भरोसा सेल परिसरात घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपाली चव्हाण (वय 32, रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्या सेव्हन स्टार मॅनेजमेंट या खासगी कंपनीत कार्यरत आहेत. संबंधित कंपनीकडे अहिल्यानगर महापालिकेच्या आदेशानुसार नो-पार्किंग क्षेत्रातील वाहने उचलून निश्चित ठिकाणी जमा करण्याची जबाबदारी आहे.
शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चव्हाण या आपल्या सहकार्यांसह नो-पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करत होत्या.
त्यावेळी एमएच-16 बीई-9792 क्रमांकाची मोपेड नो-पार्किंगमधून उचलून भरोसा सेल कार्यालय परिसरात जमा करण्यात आली होती.
याच कारणावरून वाहनधारक इरफान लाल शेख (रा. मुकुंदनगर) आणि त्याच्यासोबत असलेल्या पत्नी व मुलीने घटनास्थळी येऊन चव्हाण यांच्याशी वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. वादाचे रूपांतर पुढे धक्काबुक्की व मारहाणीत झाले. संशयित आरोपींनी चव्हाण यांना ढकलून दिले तसेच त्यांच्या हातातील चलन काढण्यासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस खाली पाडले. त्यामुळे संबंधित उपकरणाचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.




