ज्ञानेश्वरी ग्रंथ देशासाठी भूषणावह साहित्यिक दत्तात्रय वारकड सोनई येथे मराठी साहित्य परिषदेचा ज्येष्ठ नागरिक मेळावा उत्साहात संपन्न
अहिल्यानगर

मुळा एजयुकेशन सोसायटी संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई व महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा सोनई यांचे संयुक्त विद्यमाने म. सा.प. सोनई शाखेच्या सभासद आणि ज्येष्ठ नागरिकांचा स्नेह मेळावा, आजी आजोबा शिक्षक व मुले यांचा मेळावा तसेच मराठी संवर्धन पंढरवडा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ काल्हापुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म. सा. प. शाखा सोनईचे उपाध्यक्ष व मुळा एजयुकेशन संस्थेचे सचिव माजी प्राचार्य उत्तमराव लोंढे होते.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी साहित्यिक, लेखक व प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकड यांनी माऊलींचा जीवन प्रवास वर्णिताना तरुणांबरोबरच ज्येष्ठ व्यक्तींच्या देखील अंगावर रोमांच पुलकवला.
संत ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंडे यांनी आपल्या जीवनामध्ये अतिशय हाल अपेष्टा सोसल्या प्रवाहाच्या विरोधात जीवन जगले मात्र त्यांनी कधीही समाजाविरुद्ध तक्रार केली नाही किंवा आपल्या सभोवतालच्या परिस्थिती विरुद्ध तक्रार केली नाही आजच्या युवा पिढीला व सर्वांनाच ही बाब माउलींच्या व्यक्ती चरित्रातून खूप प्रेरणा घेण्यासारखी आहे. तेराव्या शतकातील समाज अन्याय अत्याचार दारिद्र्य अंधकारमय युगामध्ये बरबटलेला व अज्ञानी होता अशा या समाजाला ज्ञानदानाचे महान कार्य संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या जीवन कार्यातून समाजाला प्रबोधित केले. ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यासारख्या पवित्र महान ग्रंथांचे निर्मिती वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी प्रारंभ केला व वयाच्या 16 व्या वर्षी पूर्ण केले. शके 1212 मध्ये नेवासा नगरी येथील पैस खांबाला टेकून हे महान कार्य त्यांनी पूर्ण करून अखिल विश्वाला ज्ञानदानाचे महान कार्य करून ठेवले. त्यांनी निर्माण केलेल्या या महान ग्रंथाच्या निर्मितीमुळे जगाच्या पातळीवर मराठी वाड्मयामध्ये भारत देशाचा नावलौकिक उंचावला.
ज्ञानेश्वरी मधील माऊलींचे ज्ञान म्हणजे उच्च पराकोटीच्या बुद्धिमत्तेचा परमोच्च साक्षात्कार होय. भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये माऊलींनी आपले जीवन समर्पित केले. भागवत धर्मामध्ये जे आचरण सांगितले आहे तसे आचरण करून कोणीही ईश्वर प्राप्त करू शकतो हा मौलिक मूलमंत्र माऊलींनी समाजाला दिला.
माऊलींनी या जगतावर अनंत उपकार करून ठेवलेले आहेत याची माहिती वक्ते वारकड यांनी सोदाहरण स्पष्ट केले व उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकले. माऊलींच्या व्यक्ती चरित्रावर बाबत तरुण युवकांना काही प्रश्न विचारून त्यांना विचारक्रांत केले.
नऊ ओव्यांचे पसायदान, अठ्ठावीस अभंगाचा हरिपाठ तिच्यामध्ये हरिनामाचे महत्त्व माउलींनी स्पष्ट केलेले आहे,चांगदेव पासष्टी, यांची निर्मिती करून अखिल विश्वाला महान ज्ञानदानाचे कार्य माउलींनी केले आहे.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या जेष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर यांना बघून वक्ते श्री.वारकड म्हणाले, समोर बसलेल्या माता पिता तुल्य ऋषीतुल्य ज्येष्ठ आणि श्रेष्ठ महान विभूती समोर मी माऊली यांचे व्यक्ती चरित्र वर भाष्य करणे म्हणजे चंद्र आणि सूर्य यांच्या पंगतीत मातीच्या छोट्या दिव्याला नेवून बसवल्या प्रमाणे आहे.
आज माझे जे वय आहे तितके समोरील सुजान स्रोते भाविकांचा तितका अनुभव आहे त्यांच्या समोर मी काय बोलावे अशी अत्यंत प्रेरणादायी वक्तव्याने वक्त्याने सभोवतालच्या श्रोत्यांची मने जिंकली. अध्यक्षीय भाषणात श्रीयुत लोंढे म्हणाले की, अशा उपक्रमातून जीवनमूल्ये,नैतिकता, संवाद कौशल्य, इतिहास आणि संस्कृती वाढीस लागून विद्यार्थी व सामाजिकता बळकट होईल अशी मा. खा. यशवंतरावजी गडाख साहेब यांची इच्छा आहे म्हणून असे कार्यक्रम महाविद्यालयात राबविले जातात.
यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिकांना आदर व सन्मान द्यावा यासाठी महाविद्यालयातील डॉ.सोपान नजन यांनी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली.
या कार्यक्रमासाठी म.सा.प. सोनई शाखेचे पदाधिकारी व सभासद तसेच सोनई येथील मारुती मित्र मंडळाचे ज्येष्ठ नागरिक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी संस्थेचे सहसचिव विनायक देशमुख, अधिक्षक जालिंदर घुले, प्रा. डॉ. ज्ञानदेव झीने , माजी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गवळी, श्री. शिकारे साहेब. श्री. चंद्रकांत आघाव गुरुजी, श्री.पोपटराव घावटे गुरुजी,डॉ. बाबासाहेब शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप खेडकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ.हरिश्चंद्र सडेकर यांनी करून दिला.कार्यक्रमाचे आभार डॉ. संभाजी दराडे यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




