भाजप-एकनाथ शिंदे शिवसेना किती जागांवर लढणार?

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेत जागावाटपासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. या चर्चेअंती आता भाजप आणि शिंदे सेनेच्या मुंबईतील जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिका निवडणूक साठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी भाजप 140 आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना 87 जागा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. या महापालिकेमध्ये महायुतीतील अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना मिळून 227 जागा लढवणार आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा आता कधी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी जागावाटपाच्या पहिल्या बैठकीत भाजपने मुंबईत शिंदे गटासाठी फक्त 52 जागा सोडण्याची तयारी दाखवली होती. मात्र, ठाकरे बंधूंच्या युतीनंतर भाजपने आता शिवसेनेला जास्त जागा देऊ केल्या हाेत्या. परंतु, जागावाटपच्या या सूत्रावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब कधी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
युतीचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मुंबई महापालिकेत 227 वॉर्ड आहेत. त्यात भाजप 140 जागा लढवेल. शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला 87 जागा येतील. आरपीआयला भाजपच्या कोट्यातून जागा मिळतील अशी सूत्रांची माहिती आहे. भाजपचा 150 जागांसाठी प्रयत्न आहे. पण त्यांना 140 वर समाधान मानावे लागेल अशी सूत्रांची माहिती आहे. विधानसभा निहाय कुठल्या वॉर्डातून कोण निवडणूक लढवणार या बद्दल अजून स्पष्टता नाहीय..
आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे.
मुंबई महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च, 2022 रोजी संपुष्टात आला. तेव्हापासून मुंबई महापालिकेवर प्रशासक आहे. मुंबई महानगरपालिकेची मागील निवडणूक 2017 रोजी झाली होती. यावेळी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर महापौर म्हणून कार्यरत होत्या.




