नगर महापालिकेतील नागरिकांच्या महत्वाची फाईल चोरीला..पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागातून एक अत्यंत महत्त्वाची चौकशी अहवालाची मूळ संचिका (फाईल) चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नगररचना विभागातील सहाय्यक संचालक स्नेहल चंद्रकांत यादव (वय 41) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी (2 सप्टेंबर) फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, सावेडी एका भुखंड जागेमध्ये सुधारित बांधकाम परवानगीसंबंधी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये संरक्षण विभागाचे बनावट एनओसी वापरण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्या वेळी अतिरिक्त आयुक्त यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी आपला चौकशी अहवाल तयार करून आयुक्तांकडे सादर केला होता.
सदर चौकशी अहवालाची संचिका 18 एप्रिल 2023 रोजी रजिस्टर क्रमांक 12 ने आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आली होती. त्यावर आयुक्त कार्यालयातील रजिस्टरमध्ये 21 एप्रिल 2023 रोजी क्रमांक 79 ने नोंद असून, ती संचिका पुन्हा नगर रचना विभागाकडे पाठविण्यात आल्याचे रेकॉर्डवरून स्पष्ट होते. मात्र प्रत्यक्षात ती संचिका कार्यालयात उपलब्ध नसल्याचे आढळून आले.
या संदर्भात नगर रचना विभागाने जुलै 2024 मध्येच पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे गहाळ संचिकेबाबत तक्रार केली होती. त्यानंतर विविध स्तरावरून तपास व पत्रव्यवहार झाला. जिल्हाधिकारी यांनीदेखील 14 नोव्हेंबर 2024 रोजी महानगरपालिका आयुक्तांना एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते.
नगर रचना विभागाने पुन्हा एकदा सर्व खातेप्रमुखांना नोटीस देऊन संचिका चुकीने दुसर्या विभागात गेली असल्यास परत पाठविण्याचे आवाहन केले होते. मात्र तपासाअंती असे निष्पन्न झाले की, आर्थिक फायद्यासाठी किंवा मूळ गुन्ह्यातून आरोपींचा बचाव व्हावा या उद्देशाने अज्ञात व्यक्तींनीच चौकशी अहवालाची मूळ संचिका चोरी केली आहे.
या संचिकेत बनावट एनओसी प्रकरणातील चौकशी अहवालाचा समावेश असून, त्याला प्रकरणातील महत्त्वपूर्ण पुरावा मानले जात होते. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. याबाबत सहाय्यक संचालक यादव यांनी मंगळवारी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सरू केला आहे.