जिल्ह्यात ५ सप्टेंबर रोजी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा

अहिल्यानगर ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुखकर्ता लॉन्स, नेप्ती चौक (बायपास), नगर–कल्याण रस्ता, अहिल्यानगर येथे करण्यात आले आहे.
या कार्यशाळेस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांच्यासह पद्मश्री पोपटराव पवार, यशदाचे उप महासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सरपंच, जिल्हा व तालुकास्तरीय वरिष्ठ अधिकारी तसेच ग्रामपंचायत अधिकारी अशा सुमारे २ हजार प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहेत.
या कार्यशाळेचे उद्दिष्ट पंचायत स्तरावर विकास आराखडे तयार करणे, ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढविणे, शाश्वत विकास उद्दिष्टांवर आधारित उपक्रम राबविणे तसेच पारदर्शक, उत्तरदायी व डिजिटल ग्रामशासन प्रस्थापित करणे हे आहे. यामध्ये ग्रामसभांच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास आराखडा, शाश्वत विकास उद्दिष्टांची अंमलबजावणी, ई-गव्हर्नन्स व डिजिटायझेशन, महिला–युवक व वंचित घटकांचा सहभाग आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
ही कार्यशाळा पंचायत राज व्यवस्थेला नवे वळ देऊन ग्रामविकासाचे नियोजन अधिक परिणामकारक होण्यास हातभार लावेल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी व्यक्त केला आहे.