ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर एमआयडीसीत पुन्हा खंडणीखोरांचा हैदोस, उद्योजकांचा त्रास कधी थांबणार?

काही वर्षांपूर्वी 'इंडस्ट्रियल हब' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरच्या एमआयडीसीत आता गुन्हेगारी आणि खंडणीखोरांनी हैदोस घातला आहे.

अहिल्यानगर राज्यातील औद्योगिक प्रगतीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या अहिल्यानगर एमआयडीसी विभाग मात्र दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या विळख्यात सापडत चालला आहे. संघटित गुन्हेगारी, टोळी युद्ध तसेच खंडणीखोरांच्या त्रासाला कंटाळून याआधीच अनेक मोठ्या कंपन्यांनी आपले बस्तान नगरमधून इतरत्र हलविले आहे. काही वर्षांपूर्वी ‘इंडस्ट्रियल हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरच्या एमआयडीसीत आता गुन्हेगारी आणि खंडणीखोरांनी हैदोस घातला आहे. केवळ दोन दिवसांत दोन खंडणीचे गुन्हे दाखल झाल्याने पुन्हा एकदा औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या दहशतीचा आणि त्यामागील राजकीय संगनमताचा चेहरा उघड झाला आहे.

उद्योजकांना त्रास देण्याचे काम :  गेल्या कित्येक महिन्यापासून नगरच्या एमआयडीसीत काही खंडणीखोर वेगवेगळ्या संघटना आणि राजकीय पक्षाच्या माध्यमातून उद्योजकांना त्रास देण्याचे काम सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खंडणीची पहिली तक्रार ७ ऑगस्ट रोजी दाखल झाली. त्यानंतर लगेचच ९ ऑगस्ट रोजी दुसरी खंडणीची तक्रार एमआयडीसी पोलिसांत दाखल झाली आहे. त्यामुळे नगरच्या एमआयडीसीतील खंडणीचे हे शुक्लकाष्ठ कधी संपणार असा सवाल आता नगरकर विचारू लागले आहेत.

बॅटरी उत्पादक कंपनीच्या व्यवस्थापकाची पहिली तक्रार : नगर एमआयडीसीत लाखोंच्या खंडणी प्रकरणाने राजकीय वर्तुळासह औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडवली आहे. खंडणीचा पहिला गुन्हा ७ ऑगस्ट रोजी नामांकित बॅटरी उत्पादक कंपनीच्या व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून आकाश बबन दंडवते व त्याच्या तीन साथीदारांविरूद्ध दाखल झाला. या टोळीने ६ ऑगस्टला पुण्यावरून आलेल्या मालवाहू टेम्पोला गेट क्रमांक ३ वर अडवून चालकाकडे रोख रकमेची मागणी केली होती.

खंडणीची दुसरी घटना : दुसऱ्या दिवशी नाशिकहून आलेल्या वाहन चालकाला वाहन जाळण्याची धमकी देण्यात आली. इतकेच नव्हे, तर एक्साईडचे पुरवठादार सॅमटेक आणि वेटझन यांच्या वाहनांनाही अडवून खंडणीची मागणी केल्याची माहिती कंपनीला ई-मेलद्वारे मिळाली. यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक माणिक चौधरी यांनी पुढाकार घेऊन यामध्ये थेट गुन्हा दाखल केला आणि हा प्रकार उघडकीस आला.

कायदेशीर कारवाई सुरू :  दरम्यान, या दोन्ही खंडणीच्या प्रकरणावर सध्या पोलीस प्रशासनाकडून बोलण्यास नकार दिला असला तरी सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सांगितलं की, “सदर खंडणी प्रकरणी तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला असून, याचा सखोल तपास करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा : ७ ऑगस्ट रोजी खंडणीचा पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर दोनच दिवसांत खंडणीचा दुसरा गुन्हा ९ ऑगस्ट रोजी चिरंजीव दत्तात्रय गाढवे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन योगेश गलांडे व दत्तात्रय तापकीरे (दोघे रा. बोल्हेगाव) यांच्या विरोधात नोंदवला गेला.

खंडणीसाठी दबाव : तक्रारदार चिरंजीव गाढवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ऑगस्ट 2023 ते जुलै 2025 च्या दरम्यान गलांडे आणि तापकीरे या दोघांनी दोन वर्षांपासून कंपनीकडून मिळणारे जॉबवर्क चालू ठेवण्यासाठी प्रत्येक ऑर्डरवर 10% रक्कम द्यावी लागेल असा दबाव टाकून, पैशासाठी वारंवार धमक्या देण्यात आल्या. तर पैशांचा प्रवाह थांबवल्यानंतरही भविष्यात एमआयडीसीमधून कोणतेही काम मिळू देणार नाही, अशा स्पष्ट धमक्या देण्यात आल्याचे गाढवे यांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यातील गुन्हा दाखल झालेले योगेश गलांडे हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेना युवासेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून नगरमध्ये कार्यरत आहेत.

नगर एमआयडीसीतील गुन्हेगारीचे ग्रहण कधी संपणार? : सामाजिक कार्यकर्ते योगेश साठे व नितीन भुतारे यांनी अहिल्यानगर एमआयडीसीतील संघटित गुन्हेगारी आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून लघु आणि मध्यम उद्योजकांना होणारा त्रास यातून उद्योगांची सुटका होणार की नाही? असा सवाल प्रशासनाला केला आहे. निवडणुकीच्या काळात औद्योगिक विकासाच्या घोषणा केल्या जातात. मात्र, वास्तवात उद्योगपती प्रचंड दहशतीत आहेत. याकडे प्रशासनासह राज्य सरकारकडून लक्ष दिले जात नाही याची खंत वाटते. “सुपा, शिर्डी यांसह जिल्ह्याशेजारील रांजणगाव आणि छत्रपती संभाजीनगर एमआयडीसीने मागील वर्षांत झपाट्याने प्रगती केली आहे. याउलट मात्र, अहिल्यानगर एमआयडीसीला लागलेले ग्रहण हटवण्याची राजकीय इच्छाशक्तीच जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना दिसत नाही.

मुलभूत सुविधा, उद्योगपयोगी पायाभूत सुविधा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भयमुक्त वातावरण या तिन्ही गोष्टी येथे कोलमडल्या आहेत. परिणामी, गुंतवणूकदार नगरच्या एमआयडीसीत गुंतवणूक करण्यास धजावत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. आता यातून सरकार काय मार्ग काढते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे,” अशी खंत या दोघांनी बोलून दाखवली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे