नगरच्या अक्षय भापकर यांची कर्तबगारी. हिमालयातील19,951 फूट उंच माउंट शिनकुन शिखर सर
अहिल्यानगर

हिमालयातील बर्फाच्छादित शिखरे गिर्यारोहकांना नेहमीच नवे आव्हान देतात. तीव्र चढाई, विरळ प्राणवायू, थंडगार तापमान आणि अचानक बदलणारे हवामान यामुळे ही शिखरे सर करणे सोपे नाही. मात्र या सर्व अडथळ्यांवर मात करत अहिल्यानगर येथील ट्रेकयात्री गिर्यारोहण संस्थेचे गिर्यारोहक अक्षय भापकर यांनी तब्बल 19,951 फूट (6,081 मीटर) उंचीचे माऊंट शिनकुन यशस्वीरित्या सर करत नगरवासीयांचे नाव उंचावले आहे.
भापकर यांनी या मोहिमेपूर्वी गिर्यारोहणाचे तांत्रिक प्रशिक्षण घेतले. तसेच धावणे, वजन पाठीवर घेऊन सह्याद्रीतील डोंगर चढणे, कठोर शारीरिक सराव अशा तयारीनंतर त्यांनी हे आव्हान स्वीकारले. याआधी त्यांनी माऊंट युनाम (6,111 मीटर) हे शिखरही सर केले आहे.
ही मोहिम 20 जुलै रोजी झंस्कार- जिस्पा येथून सुरू झाली. 22 जुलैला पथक बेस कॅम्पवर पोहोचले आणि 25 जुलै 2025 रोजी सकाळी 9 वाजता गिर्यारोहकांनी शिखर सर करत शिनकुनच्या शिखरावर तिरंगा फडकावला.
पथकात अक्षय भापकर यांच्यासह अंकित सोहोनी, कुशल मासाळ, आनंद चिनूरकर, संपत मालू, नमिता शेळके, डॉ. सुनीता राठी आणि गिर्यारोहक संघाचे प्रमुख डॉ. सुमित मांदळे यांचा समावेश होता.
लाहौल-स्पीती व जम्मू-काश्मीर सीमेवर वसलेले माऊंट शिनकुन हे तांत्रिकदृष्ट्या अवघड शिखर मानले जाते. पथकाने पूर्वेकडील कठीण बाजूने ही चढाई पार केली, अशी माहिती डॉ. मांदळे यांनी दिली.
अक्षय भापकर यांच्या या यशाबद्दल ट्रेकयात्री गिर्यारोहण संस्थेचे गिर्यारोहक रविंद्र चोभे, अमित सोनग्रा आणि आकाश पातकळ यांनी त्यांचा सत्कार केला. भापकर यांचे हे यश स्थानिक गिर्यारोहण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.