२४ डिसेंबरच्या आत आरक्षण जाहीर करा – मनोज जरांगेंचा सरकारला गंभीर इशारा
मुंबई

मराठा आरक्षण जनजागृती करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांचा दौरा सुरू आहे. बुधवारी सकाळपासून अंतरवाली सराटी इथून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, धारा शिवमधील सभेनंतर जरांगे रात्री उशीरा करमाळा येथील मराठा बांधवांना देखील संबोधित केलं. यावेळी त्यांनी ७० वर्षांची मराठा समाजाची सल बोलून दाखवली.
राज्य सरकारने मराठा समाजाला २४ डिसेंबरच्या आत आरक्षण जाहीर करावे अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी करमाळ्याच्या सभेत दिला. माझ्या जीवात जीव असे पर्यंत मी समाजासाठी लढत राहणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय मी एक इंच पण मागे हटणार नाही. एक डिसेंबरपासून गावागावात साखळी उपोषण सुरू करा, असं आवाहनही मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना केलं.
प्रत्येक गावोगावी लोकांनी माझं स्वागत केलं, त्यामुळे येथे यायला उशीर झाला. मराठा समाज बांधव गाडीला आडवे पडून मला थांबवून माझे स्वागत करत होते. त्यामुळे मला यायला उशीर झाला. इतक्या वेळानंतर ही तुम्ही माझ्यासाठी बसून आहात. नक्कीच तुमच्या या सभेची महाराष्ट्र नोंद घेईल, असं सांगत जरांगे पाटील यांनी सभेला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी ही व्यक्त केली.