दसरा दिवाळीआधी महागाईची वर्दी, खाद्यतेलानंतर सुका मेवाही कडाडला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
नाशिक - घाऊक आणि किरकोळ बाजारात विविध वस्तूंच्या दरांत वाढ होत आहे. ऐन दसरा-दिवाळीच्या तोंडावर अनेक वस्तूंच्या दरांत मोठी दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

घाऊक आणि किरकोळ बाजारात विविध वस्तूंच्या दरांत वाढ होत आहे. ऐन दसरा-दिवाळीच्या तोंडावर अनेक वस्तूंच्या दरांत मोठी दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
मागील आठवड्यात खाद्यतेलांचा भडका उडाला. यानंतर खोबरे, जायफळ, शहाजिरे, मखाणा, काजू आदी वस्तूंच्याही दरांत प्रचंड वाढ झाल्याने दसरा-दिवाळीच्या आधीच महागाईचे सावट येवून ठेपले आहे.
जवळपास महिनाभरावर दिवाळी आली आहे. दिवाळीत खाद्यतेलांसह सुका मेवा आणि इतर वस्तूंच्या मागणीत मोठी वाढ होते. मात्र, ऐन सणउत्सवाच्या तोंडावर केंद्र सरकारने खाद्यतेलांवरील आयात शुल्कात २० टक्के वाढ केल्याने गेल्या आठवडाभरापासून खाद्यतेलांच्या दरांत प्रचंड वाढ नोंदविण्यात आली आहे.
परिणामी, अगोदरच खाद्यतेलांच्या दरवाढीने होरपळलेल्या सर्वसामान्यांना खोबरे, जायफळ, शहाजिरे आणि इतर अनेक पदार्थ महाग झाल्याने मोठा फटका सहन करावा लागत आहे. स्थानिक बाजारात गेल्या आठवडाभरात खाद्यतेल १५ किलोच्या डब्यामागे २७५ ते तीनशे रुपयांची वाढ झालेली आहे.
असे आहेत दर (घाऊक बाजार)
■ खाद्यतेल (प्रति १५ किलो)
■ सूर्यफूल : २०२५ (१५ लीटर)
■ सोयाबीन : २०९०
■ शेंगदाणा : २७००
आर्थिक गणित बिघडणार
सध्या घाऊक बाजारात खोबरे २८० रुपये, मखाणा १६०० रुपये, काजू ९५० रुपये, शहाजिरे १००० रुपये, खोबरे किस ३०० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे.
येत्या काही दिवसांत दरांत अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे आता दिवाळीसाठी फराळ करताना गृहिणींचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नारळ २५ रुपयांना
यंदा उत्पादन घटलेले असल्याने बाजारात नारळाची आवकही कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात खोबरे महागलेले असतानाच नारळाच्याही दरांत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात यापूर्वी २० रुपयांना मिळणारे नारळ आता २५ रुपयांना मिळत आहे.
झालेली दरवाढ अनपेक्षित होती. दिवाळीतही दर चढेच राहिल्यास फराळ करताना आर्थिक जुळवाजुळव करणे अवघड होईल. असे गृहिणी अश्विनी कुयटे यांनी सांगितले आहे.
केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयातशुल्क वाढविल्याने दर प्रचंड वाढले आहेत. खाद्यतेलांच्या दरांनी उच्चांक गाठलेला असतानाच मागील आठवड्यातच मखाणा, काजू, जायफळ, शहाजिरे, खोबरेही महाग झाले आहे, असे व्यवसायिक प्रवीण संचेती सांगतात.