अहमदनगरमध्ये साथीच्या आजाराचे थैमान.डेंग्यूसह गोचिड तापाचे तब्बल ‘इतके’ रुग्ण, ‘सिव्हिल’मध्ये नमुने तपासण्यासाठी रांग
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात विविध साथीच्या आजारांनी थैमान घातल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी गोचीड ताप, डेंग्यू, टायफाईड आदी रुग्ण आहेत. तर काही ठिकाणी चिकनगुनियाचेही रुग्ण असल्याचे समजते.
त्यामुळे अनेक क्लिनिक फुल असून सिव्हिलच्या प्रयोगशाळेत नमुने तपासण्यासाठी रुग्णांची रांग लागल्याचे चित्र आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत नोंद करण्यात आलेल्या माहिती नुसार १५ ते २६ जून या १२ दिवसांच्या कालावधीत नगर जिल्ह्यात डेंग्यूचे ८ पॉझिटिव्ह, तर गोचिड तापाचे १८ रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत तशी नोंद करण्यात आली आहे. डेंग्यूबरोबरच गोचीड तापीचे व तीव्र तापीचे देखील रुग्ण आढळून येत आहे. एप्रिल मे महिन्यात डेंग्यूचे रुग्ण अल्प प्रमाणात आढळून येत होते. मात्र पावसाळा सुरू होताच डेंग्यू रुग्णांत वाढ झाली.
दरम्यान, २६ जून पासून ५० डेंग्यू संशयित रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रलंबित आहेत. ३० पेक्षा जास्त नमुने एकत्र झाल्यानंतर या नमुन्यांची एकत्रित तपासणी केली जाते. जूनच्या पंधरवड्यात मोठा पाऊस झाला. पाऊस उघडताच अनेक साथीच्या आजारांनी थैमान घातल्याचे चित्र आहे.
डेंग्यूसह व्हायरल, टायफॉईडचेही रुग्ण
१५ जूनपर्यंत ३९ रुग्णांच्या रक्त तपासणीनंतर डेंग्यूचे ५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर २६ जून पर्यंत ४० रुग्णांच्या रक्त तपासणीनंतर ३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
टायफॉईडचे ५७ नमुने तपासणी पैकी ४ पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर गोचीड तापाचे १८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सरकारी रुग्णालयांबरोबरच खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील गेल्या पंधरा दिवसापासून डेंगूच्या तपासणीसाठी मोठ्या संख्येने रुग्ण येत आहेत.