
नगर शहरात जीर्ण इमारतींचा प्रश्न नेहमीच चर्चेत येतो. पण त्यावर काहीच उपाययोजना होताना दिसत नाहीत. नगर शहरात जवळपास शंभराहून अधिक इमारती जीर्ण झाल्या असून, त्या कधीही कोसळण्याची भीती नगरकरांना आहे.
दरम्यान नुकतीच काल (१५ मे) शहरातील दाळमंडईतील इमारतीचा काही भाग कोसळला. त्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळा तोंडावर आहे, त्यात एखादी इमारत कोसळली, तर जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नगरकर उपस्थित करत आहेत.
शहरात शंभरापेक्षा अधिक धोकादायक इमारती आहेत. पावसाळा आला की या इमारत मालकांना नोटिसा बजाविण्यात येतात. परंतु त्यानंतरची कोणतीच कारवाई महापालिकेकडून होताना दिसत नाही असे म्हटले जाते. मागील वर्षी महापालिकेने तीन इमारती पाडल्या होत्या. परंतु उर्वरित इमारती आजही धोकादायक अवस्थेत उभ्या आहेत.
बहुतांश इमारत मालक शहर सोडून दुसरीकडे स्थायिक आहेत. या इमारती पाडायच्या कुणी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. माळीवाडा, दिल्लीगेट, चौपाटी कारंजा, कापडबाजार, चितळे रोड, नवीपेठ, सर्जेपुरा अशा गर्दीच्या ठिकाणी या इमारती आहेत. पावसाळ्यापूर्वी या इमारती पाडाव्यात, अशी मागणी नागरिक करत आहे.
किती इमारती धोकादायक
१०० धोकादायक इमारती असून यातील ३० मनपाकडील नोंद असलेल्या आहेत.
काही इमारती वादात
धोकादायक इमारती पाडाव्यात, यासाठी मनपाकडून दर वर्षी इमारत मालकांना आवाहन करण्यात येते. मात्र, काही इमारतींचा वाद न्यायालयात सुरू आहे, तर काही ठिकाणी मालक व भाडेकरूंमध्ये वाद सुरू आहेत. त्यामुळे इमारत पाडण्यासाठी मनपाकडे येणारे अर्ज हे केवळ भाडेकरूंना हटवण्यासाठीच असतात. भाडेकरूंना हटविण्याचा हा सोपा फंडा इमारत मालकांनी शोधून काढला असल्याची चर्चा आहे.