कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळ्यांचा उद्योग. नगरमध्ये दोन कॅफेंवर छापे
अहमदनगर

शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या सावेडी उपनगरातील दोन कॅफेवर तोफखाना पोलिसांनी छापेमारी करत कॅफे चालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले. तेथे अश्लील चाळे करताना पकडलेल्या मुला-मुलींना पोलिसांनी समज देऊन सोडून दिले.
शहरातील मनमाड रस्त्यावरील डौले रुग्णालयजवळील स्टेला कॅफेत शाळा, महाविद्यालयीन मुला-मुलींना जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती.
त्यांनी काल, सोमवारी छापा टाकला असता कॅफेमालक अंजिक्य बाळासाहेब कोतकर (२०, रा. कोतकर मळा, केडगाव) हा मिळून आला.
कॅफेच्या नावाखाली प्लायवुडचे कम्पार्टमेंट करून, पडदे लावून अंधार करून मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे आढळले. कोतकरला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मनमाड रस्त्यावरीलच बॉलिवूड कॅफेतही तोफखाना पोलिसांना आज, मंगळवारी दुपारी छापा टाकला. तेथे कॅफेचा मालक सुमित भाऊसाहेब ठोंबे (१८, रा. अरणगाव, नगर) आढळला. त्यानेही अशीच जागा उपलब्ध करून दिल्याचे आढळले. त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांच्या पथकाने केली.