पुन्हा शेअर मार्केट फसवणुकीचा धुमाकूळ, अहमदनगरमधील व्यावसायिकाला १५ लाखांना गंडा
अहमदनगर

शेअर मार्केटमध्ये नफा मिळणार असल्याचे दाखवित व्यापाऱ्याची १५ लाख ५५ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात ग्रुप अॅडमिनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजीव अनंत सहस्त्रबुद्धे (रा. सिद्धिविनायक सोसायटी, सावेडी) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना ६० व्हीआयपी इंस्ट्यूटुशनल अकाउंट या ग्रुपच्या अॅडमिन अक्षिता बोरा याने शेअर मार्केटमध्ये अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवित पैसे गुंतविण्यास सांगितले.
शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास नफा मिळवून देतो असे सांगून विश्वास संपादन केला. सहस्त्रबुध्दे यांनी त्या व्यक्तीवर विश्वास ठेऊन १५ लाख ५५ हजार रुपयांची गुंतवणूक केली. परंतु ग्रुप अॅडमिनने पैसे परत करण्यास नकार दिला. फिर्यादीने वेळोवेळी पैशाची मागणी केली. परंतु आरोपीने पैसे दिले नाहीत, ना नफा. तसेच मुद्दल परत करण्यासही टाळाटाळ केली.
त्यामुळे आपली फसवणूक झाली आहे, अशी फिर्यादीची खात्री झाली. त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असून, पुढील तपास सायबर पोलिस करीत आहेत.