ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सुजय विखेंकडून चुका झाल्या असतील पण, त्यांच्या वडिलांनी निकालानंतर बाळासाहेब थोरातांचं मोठं वक्तव्य

अहमदनगरमध्ये लोकसभा निवडणूक निकालानंतर बाळासाहेब थोरातांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका केली आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे नीलेश लंके यांनी निर्णायक आघाडी घेतल्यानंतर माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”सुजय विखे हे तरुण आहेत, पहिल्यांदाच खासदार झाले.

त्यांच्याकडून काही चुका झाल्याही असतील पण त्यांचे वडील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दशहतीच्या राजकारणाला वैतागून लोकांनी नीलेश लंकेसारखा कार्यकर्ता पुढे आणला”, असे थोरात म्हणाले.

नगर जिल्ह्यात थोरात आणि विखे पाटील यांच्यात टोकाची राजकीय स्पर्धा आहे. या लोकसभा निवडणुकीतही ती दिसून आली. या निवडणुकीत विखे पाटील यांच्याकडे नगर शिर्डीतील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांची जबाबदारी होती. तर थोरात यांच्याकडे महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांची होती. दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. थोरात दोन्ही मतदारसंघात सक्रीय होते.

विखे पाटील यांनीही राज्यात कोठेही न जाता येथेच लक्ष केंद्रीत केले होते. प्रचारात इतर मुद्द्यांसोबतच विखे-थोरात यांच्यातही आरोपप्रात्यारोप सुरू होते. आता महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार विजयी होत असताना थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिर्डीसंबंधी थोरात म्हणाले, ”भाऊसाहेब वाकचौरे पूर्वी खासदार होते. त्यांचा संपर्कही आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची खात्री होतीच. आमच्यासाठी नगरचा विजय महत्वाचा आहे. तेथे आमचे नीलेश लंके हे साधे कार्यकर्ते कसे पुढे आले? हे लक्षात घ्यावे लागले. सुजय विखे तरुण आहेत. ते पहिल्यांदा खासदार झाले. त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतीलही. मात्र, लोकांना खरा राग महसूलमंत्री आणि पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यात विशेषत: पारनेर तालुक्यात जे दहशतीचे राजकारण केले, यंत्रणेला हाताशी धरून सत्तेचा जो गैरवापर केला, त्याचा खरा राग होता. त्यातून लोकांनी लंके यांना पुढे आणले आणि निवडणूनही दिले, ही वस्तुस्थिती आहे. त्यांची दशहत आता लोकांनी संपविली, आणखी थोडी संपविण्याची राहिली आहे”, असेही थोरात म्हणाले.

राज्यातील निकालाबद्दल थोरात म्हणाले, ”काँग्रेस हा शाश्वत विचार आहे, हे लोकांनीही मान्य केले आहे. आम्हीही तेवढ्याच जबाबदारीने काम करीत आहोत. हाच विचार देशात आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे.

आता मुख्यमंत्र्यांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे. ते सत्तेसोबत का गेले, याची खरी कारणे त्यांना माहिती आहेत. मात्र ही मोडतोड लोकांना आवडलेली नाही. त्यामुळे विधानसभेला महाविकास आघाडीची सत्ता येणार हे नक्की”, असेही थोरात म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे