प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांची प्रकृती गंभीर, अमेरिकेतील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु
प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत अशी माहिती समोर आली आहे.

प्रसिद्ध तबला वादक, अभिनेते, संगीतकार झाकीर हुसैन यांची प्रकृती बिघडली आहे. झाकीर हुसैन यांना अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्को येथील रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांना हृदयासंबंधीचा त्रास जाणवतो आहे. त्यांचे मित्र आणि प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरासिया यांनी ही माहिती दिली आहे.
अमेरिका स्थित झाकीर हुसैन यांना रक्तदाबासंबंधीचा त्रास जाणवतो आहे अशी माहिती झाकीर हुसैन यांच्या एका निकटवर्तीयाने दिली.
झाकीर हुसैन हे सुप्रसिद्ध तबलावादक अल्लाह राखा खान यांचे पुत्र आहेत. झाकीर हुसैन यांनी अनेक भारतीय आणि परदेशी चित्रपटांना संगीत दिलं आहे. ‘साझ’ या सिनेमात त्यांनी अभिनयही केला आहे. झाकीर हुसैन यांनी वडील अल्लाह राखा खान यांच्यासह तबला वादनाचे धडे वयाच्या सातव्या वर्षापासून गिरवण्यास सुरुवात केली. तसंच वयाच्या १२ व्या वर्षापासून झाकीर हुसैन देशभरात त्यांनी तबला वादन परफॉर्म करण्यास सुरुवात केली.
१९८८ मध्ये झाकीर हुसैन यांना पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण, २०२३ मध्ये पद्मविभूषण या पुरस्करांनी गौरवण्यात आलं आहे. तसंच १९९० मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा संगीत पुरस्कारही मिळाला होता. २००९ मध्ये झाकीर हुसैन ५१ व्या ग्रॅमी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब ही आहे की झाकीर हुसैन यांना त्यांच्या कारकिर्दीत ७ वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं त्यापैकी चारवेळा त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं.
झाकीर हुसैन यांच्याबाबत ही माहिती आहे का ?
झाकीर हुसैन यांचं खरं आडनाव कुरेशी असं आहे. मात्र त्यांना हुसैन असं आडनाव देण्यात आलं. झाकीर हुसैन यांनी १९८९ या वर्षी हीट अँड डस्ट या सिनेमातून त्यांनी अभिनय केला होता. २०१६ मध्ये झालेल्या ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबाबा यांनी झाकीर हुसैन यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलं होतं. व्हाईट हाऊसमध्ये कला सादर करणारे झाकीर हुसैन हे पहिले संगीतकार ठरले. झाकीर हुसैन यांनी १९७८ मध्ये इटालियन अमेरिकन कथ्थक डान्सर अँटोनिया मिनेकोला यांच्याशी लग्न केलं. या जोडप्याला दोन मुली आहेत.