पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांची नगर अर्बन बँकेला भेट, घोटाळेबाजांवरील कारवाईला गती

अवसायक व बॅंक बचाव समिती सदस्यांशी चर्चा, घोटाळेबाजांवरील कारवाईला मिळणार गती – राजेंद्र गांधी.
लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपताच पोलिस यंत्रणेने नगर अर्बन बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणी कारवाईला आणखी गती दिली आहे. पोलीस उपअधीक्षक व आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी अमोल भारती यांनी नगर अर्बन बँकेला भेट देऊन अवसायक गणेश गायकवाड तसेच बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी व ॲड. अच्युत पिंगळे यांच्या समवेत बंद दरवाजाआड महत्वपूर्ण चर्चा केली. ठेवीदारांचे ठेवींचे पैसे लवकरात लवकर परत करण्याबरोबरच जाणीवपुर्वक कर्ज थकविणाऱ्या कर्जदारांवर कडक कारवाई करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
त्याप्रमाणे अशा कर्जदारांची वेगळी यादी करणेच्या सूचना बँकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या, अशी माहिती राजेंद्र गांधी यांनी दिली.
फॉरेंसिक ऑडीट मध्ये काही आरोपींची नांवे राहून गेल्याविषयी सखोल माहीती घेतली व नजिकच्या काळात ती नावे आरोपींच्याया यादीत वाढली जातील असे अमोल भारती यांनी सांगितले. अवसायक गणेश गायकवाड यांनी बँकेची आर्थिक परिस्थिती कागदावर खुप चांगली आहे. केवळ काही कर्जदार जाणीवपुर्वक वसूलीला सहकार्य करत नसल्याने बँकेची तरलता संपल्यामुळे बँक अडचणीमध्ये दिसत आहे. वसूली बाबत सहकार्य न करणाऱ्या कर्जदारांवर कारवाई करावी लागेल असे नमूद केले.
बँकेची ऐतिहासिक व देखणी इमारत व बँकेचा वैभवशाली इतिहास ऐकून प्रभावित झालेल्या अमोल भारती यांनी ही बँक पुन्हा सुरू होण्यासाठी अवसायकांना सर्व सहकार्य करणार असल्याचे सांगितले. बँक वाचविण्यासाठी व बँक पुन्हा सुरू होण्यासाठी बँक बचाव समिती करत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे कौतुक केले.
बँकेला अडचणी मध्ये आणणारे संबंधित संचालक, काही वरिष्ठ अधिकारी व कर्जदार यांच्यावरील कारवाईला वेग दिला जाईल. लोकसभा निवडणुकीमुळे कारवाई काहीसी थंडावली होती.
परंतु आता या विषयावर पूर्ण लक्ष केंद्रीत करू, फॉरेंसिक ऑडीटरला नवीन कागदपत्रे पाठविली आहेत. त्यातून आरोपींची नांवे व घोटाळ्याचे आकडेवारीत वाढ होईल व त्याप्रमाणे कारवाईत देखील वाढ होईल असे सांगितले.
यावेळी ठेवीदार व बँकेची बाजू मांडताना राजेंद्र गांधी व ॲड. अच्युत पिंगळे यांनी पोलीस तपासाला वेग दिला तरच ठेवीदारांना ठेवी लवकर परत मिळतील व सोबत बँकेचे व सभासदांचे जाणीवपुर्वक करणेत आलेले आर्थिक नुकसान देखील भरून निघू शकते व बँक पुन्हा सुरू होण्याचा इतिहास घडू शकतो हे आकडेवारीसह पटवून सांगितले.
त्यावर अमोल भारती यांनी पोलिसांकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल व बँकेला समक्ष भेट दिल्यामुळे अनेक गोष्टी समजल्या आहेत व वैभवशाली बँकेचे पुर्नजिवन झाले तर माझ्या दृष्टीने देखील खुप आनंदाची बाब होईल असे आश्वस्त केले, असे राजेंद्र गांधी यांनी सांगितले.