पुढील दोन दिवस रात्रीही उकाडा, सर्वाधिक तापमानाची नोंद

मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तापमानवाढीचा कल कायम आहे. बुधवारी अकोल्यामध्ये देशातील सर्वाधिक ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस तापमान वाढ कायम राहण्याचा अंदाज असून, रात्रीच्या तापमानातही वाढ होऊन उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यावर प्रति चक्रवाताची स्थिती कायम आहे. त्यामुळे मागील चार-पाच दिवसांपासून तापमानात सतत वाढ होत आहे. त्यात आग्नेय दिशेने येत असलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्याची भर पडली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस कमाल-किमान तापमानातील वाढीचा कल कायम राहण्याचा अंदाज आहे. बुधवारी अकोला, अमरावती, बुलडाणा, ब्रह्मपुरी, वर्धा, यवतमाळ, बीड, नांदेड, परभणी, जळगाव, जेऊर, मालेगाव, सोलापूर या ठिकाणी ४० अंश सेल्सिअस आणि त्याहून जास्त तापमानाची नोंद झाली आहे.
तसेच जळगाव, नाशिक, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत पुढील दोन दिवस रात्रीच्या तापमानात वाढ होऊन रात्रीही उकाडा वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना दिवसा आणि रात्रीही असह्य उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.
हीट वेव्ह पासून सुरक्षेसाठी अशी घ्या काळजी
– सतत पाणी पीत रहा. त्यामुळे डिहायड्रेशपासून बचाव होईल.
– सुती , सैल, फिक्या रंगाचे कपडे घाला. त्यामुळे उष्णता जास्त शोषली जात नाही.
– कडक उन्हात जाणे टाळा. दुपारच्या रणरणत्या उन्हात बाहेर पडू नका.
– बाहेर जायची गरज असेलच तर डोक्यावर टोपी, स्कार्फ किंवा छत्री घ्या. शरीर पूर्णपणे झाका. पाण्याची बाटली आणि सनस्क्रीन नेहमी सोबत ठेवा.