राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार

देशातून मान्सून पूर्णत: परतला असून अनेक राज्यांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसून येत आहेत. दुसरीकडे खरीप हंगामातील पिके काढणीला आली आल्याने शेतीकामाला वेग आला आहे. अशातच हवामान खात्याने देशासह राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
ऐन रब्बी हंगामात राज्यात पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, कोकणसह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मुसळधार पाऊस होईल. याशिवाय काही जिल्ह्यांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहिल.
सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सध्या कोकण किनारपट्टी भागात सकाळी गुलाबी थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका असं हवामान पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मुंबई, पुण्यासह ठाण्यातील तापमानात वाढ कायम आहे. पुण्यात सकाळी गारवा, तर दुपारी उन्हाच्या झळा बसत आहेत.
तर मुंबईतील तापमानाचा पारा वाढला असून वायू प्रदूषण आणि धुके यांनीही आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. मुंबईपेक्षाही उपनगरांमधील हवा गुणवत्ता पातळी वाईट श्रेणीत आहे. मुंबई आणि उपनगरातील शहरांमध्ये पीएम १० ची मात्रा अधिक आहे, यासाठी रस्त्यांवर धूळ, सुरु असणारे बांधकाम, वाहनांद्वारे होणारे प्रदूषण जबाबदार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्येही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळमधील मलप्पुरम, इडुक्की आणि पठानमथिट्टा जिल्ह्यांमध्ये आज म्हणजेच ६ नोव्हेंबर रोजी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.