
बँकेत भरण्यासाठी दिलेले १० लाख रुपये घेऊन कामगाराने पोबारा केल्याची घटना नगर शहरात काल, मंगळवारी घडली. यासंदर्भात आडत बाजारातील किराणा व्यावसायिक प्रताप प्रेमचंद हरदवानी (६०, गुलमोहर रस्ता, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलिसांनी सुशील प्रकाश बिरादार (वाणी नगर, पाईपलाईन रस्ता, सावेडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हरदवानी यांचे आडत बाजारात महाराष्ट्र ट्रेडर्स नावाचे होलसेल किराणा दुकान आहे. त्यांच्याकडे गेल्या दीड महिन्यापासून सुशील बिरादार हा कामाला आहे. गेले काही दिवस सुशील बिरादार हा दुकानातील रोख रक्कम बँकेत विश्वासाने भरत होता. परंतु काल सकाळी ११ वा. त्याच्याकडे हरदवानी यांनी ५ लाख रुपयांची रोकड मर्चंट बँकेत जमा करण्यासाठी दिली. तो पाच लाखांची रोकड घेऊन गेला व नंतर पुन्हा दुकानात आला.
त्यानंतर हरदवानी यांनी त्याला पुन्हा ५ लाख रुपये दिले व ते पंजाब नॅशनल बँकेत भरणा करण्यास सांगितले. त्यानंतर बराच वेळ झाला तरी बिरादार हा बँकेतून परत न आल्याने हरदवानी यांनी त्याला फोन लावला असता, त्याचा मोबाईल बंद आढळला. त्यामुळे हरदवानी यांनी मर्चंट व पंजाब नॅशनल बँकेत जाऊन पैसे जमा झाले का, याची विचारणा केली. दोन्ही बँकेत पैसा जमा झाले नसल्याने हरदवानी यांनी लगेच कोतवाली पोलिसांकडे संपर्क साधला.
हरदवानी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बिरादार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल मुगडे करत आहेत.