
लोकनियुक्त ६८ नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ बुधवारी (ता. २७) पूर्ण झाला. त्यामुळे आजपासून महापालिकेच्या कारभाराची सूत्रे प्रशासनाच्या हाती आली आहेत. दरम्यान, प्रशासक म्हणून आयुक्त काम पाहणार की, जिल्हाधिकारी याबाबत राज्याच्या नगरविकास विभागाकडून रात्री उशिरापर्यंत कोणतेही आदेश महापालिकेला प्राप्त झालेले नव्हते.
नगरकरांनी डिसेंबर २०१८ च्या महापालिका पंचवार्षिक निवडणुकीत ६८ नगरसेवकांना आपले प्रतिनिधी म्हणून महापालिका सभागृहात पाठविले. त्यांचा कार्यकाळ बुधवारी पूर्ण झाला. दरम्यान, महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २०२३ मध्ये होणे अपेक्षित होते.
मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाबाबतचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे राज्यातील महापालिकांसह जिल्हा परिषद, नगर परिषदांच्या निवडणूका लांबणीवर पडल्या आहेत.
नगर महापालिकेत पदाधिकारी-नगरसेवकांचा कार्यकाळ बुधवारी संपला असला, तरी त्याबाबतचे अधिकृत आदेश गुरवारी (ता. २८) काढण्यात आले. त्यामुळे याच दिवशी असलेली स्थायी समिती सभा रद्द करण्यात आली.
त्याचबरोबर शुक्रवारी (ता. २९) होणारी महासभा देखील रद्द करण्यात आली. कार्यकाळ पूर्ण झाल्याचे आदेश गुरुवारी सकाळी अचानक निघाल्याने अनेक नगरसेवकांचा हिरमोड झाला. स्थायी समितीची सभा आणि महासभेत काही महत्त्वाचे विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते.
परंतु कार्यकाळ संपल्याने या विषयांची मंजुरी लांबणीवर पडली आहे. आता महापालिकेत प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. पंकज जावळे काम पाहणार की, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे पदभार येणार याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, महापालिकेचा प्रशासक म्हणून माझ्याकडे पदभार द्यावा, असे वक्तव्य जिल्हाधिकारी सालीमठ यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात केले होते. त्यामुळे महापालिकेत प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. जावळे काम पाहणार की,जिल्हाधिकारी सालीमठ याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, याबाबत राज्याच्या नगरविकास विभागाकडून महापालिकेला रात्री उशिरापर्यंत आदेश प्राप्त झाले नव्हते.
प्रलंबित कामांचा प्रश्न कायम
बहुतेक नगरसेवकांच्या प्रभागात पाच वर्षांत रस्ते, ड्रेनेज, पिण्याचे पाणी, लाईट यासारख्या मूलभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. त्यामुळे या नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे. आता तर कार्यकाळ संपल्याने प्रभागातील प्रलंबित कामे कशी मार्गी लागणार? असा प्रश्न या नगरसेवकांसमोर निर्माण झाला आहे.
असे होते पक्षीय बलाबल
शिवसेना (एकत्रित)- २३
राष्ट्रवादी (एकत्रित)- १९
भाजप- १५
काँग्रेस- ५
बसप- ४
सपा- १
अपक्ष- १
एकूण- ६८
महापालिकेची निवडणूक वेळेत होणे गरजेचे आहे. प्रशासनाच्या हातात कारभार गेल्यानंतर अनेक विकासकामांवर परिणाम होणार आहे. आमचा कार्यकाळ संपला असला, तरी नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करू.
– विनित पाउलबुधे,सभागृहनेते, मनपा.