
ललित पाटील प्रकरणात पदमुक्त करण्यात आलेले ससूनचे माजी डीन संजीव ठाकूर यांच्या मुलाने राजीनामा दिला आहे. डॉ. अमेय ठाकूर यांनी बी जे मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला आहे.
राजीनाम्याचे कारण अद्याप समोर न आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणामुळे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना १० नोव्हेंबरला पदमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
याच दिवशी त्यांच्या मुलाने शल्यचिकित्साशास्त्र (सर्जरी) विभागातील सहायक प्राध्यापकपदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा राजीनामा स्वत: डॉ. संजीव ठाकूर यांनी त्याच दिवशी मंजूर केल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत आहे. ‘ससून’मधील गोंधळ पाहता आपल्याला पदमुक्त केले जाईल, ही कुणकुण डॉ. संजीव ठाकूर यांना लागली होती का, या चर्चेला ऊत आला आहे.
डॉ. अमेय ठाकूर बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कंत्राटी स्वरूपात (डीएसबी) कार्यरत होते. डीएसबी स्वरूपात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा राजीनामा मंजूर करण्याचे अधिकार अधिष्ठात्यांना असतात. त्यामुळे डॉ. ठाकूर यांनी आपल्या मुलाचा राजीनामा तडकाफडकी मंजूर केल्याचे दिसून येत आहे.
डॉ. संजीव ठाकूर यांना पदमुक्त करण्याचा आणि डॉ. प्रवीण देवकाते यांना निलंबित करण्याचा निर्णय १० नोव्हेंबरला रात्री उशिरा घेण्यात आला. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची मुदतीच्या आत बदली झाल्याने त्यांनी ‘महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणा’कडे (मॅट) धाव घेतली होती. त्यानंतर हा वाद उच्च न्यायालयापर्यंत गेला आणि १० नोव्हेंबरलाच डॉ. काळे यांच्या बाजूने निर्णय लागला. सर्व निर्णय विरोधात गेल्यामुळे १० नोव्हेंबरलाच डॉ. ठाकूर यांच्या मुलाने राजीनामा दिला.
डॉ. ठाकूरांच्या अडचणीत वाढ का ?
ससून हॉस्पिटलमधून ललित पाटील पळून गेल्यानंतर येरवडा कारागृहातील काही निवडक कैद्यांची रुग्णालयात बडदास्त ठेवली जात असल्याचे समोर आले. ललितवर स्वत: डॉ. संजीव ठाकूर उपचार करीत होते. ललित पाटीलला इतके दिवस दाखल का करून घेतल्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने डॉ. ठाकूर यांच्या अडचणीत आले आहे.