पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार, विदर्भाला मात्र अवकाळी झोडपणार

बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या ‘मिचौंग’ चक्रीवादळानं आता पुढचा प्रवास सुरु केला असून, तामिळनाडूमध्ये धुमाकूळ घालणारं हे वादळ हळुहळू आंध्र प्रदेशच्या दिशेला सरकताना दित आहे. ज्यामुळं तामिळनाडू, आंध्र प्रदेशसह 17 राज्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. देशाच्या दक्षिण किनारपट्टीवर सध्या या वादळामुळं प्रचंड नुकसान झाल्याचं चित्र असतानाच महाराष्ट्रावरही त्याचे कमी-जास्त परिणाम मागील काही दिवसांपासून दिसून येत आहेत.
चक्रीवादळाच्या धर्तीवर सध्या फक्त महाराष्ट्र नव्हे तर, देशभरात हवमानात मोठे बदल होत आहेत. कुठं पावसाच्या सरी कोसळत आहेत तर कुठं थंडीचा कडाका वाढत आहे. पुढील 24 तासांसाठी वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विदर्भ आणि मराठवाड्याच अवकाळीचा तडाखा बसू शकतो. विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल.
पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर पट्ट्यामध्ये मात्र तापमानात मोठी घट नोंदवली जाऊ शकते. पुढील 72 तासांमध्ये राज्याच्या या भागात हिवाळ्याची पकड पाहायला मिळेल असाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील दोन दिवसांनंतर मात्र राज्यातील बहुतांशी हवामान कोरडंच राहण्याची शक्यता आहे.