तोफखाना पोलीस निरीक्षकांच्या बदलीसाठी आमदारांची उपोषणाची स्टंटबाजी, काँग्रेसचा आरोप ..
अहमदनगर

व्यापारी, दुकानदारांसाठी किरण काळेंचे ४ डिसेंबर पासून बाजारपेठेत धरणे आंदोलन.
तोफखाना निरीक्षकांच्या बदलीसाठी आमदारांची उपोषणाची स्टंटबाजी, काँग्रेसचा आरोप.
व्यापारी, दुकानदारां कडून करण्यात येणाऱ्या व्यावसायिक परवाना शुल्क वसुली निर्णयाला काँग्रेसच्या विरोधानंतर विविध व्यापारी संघटनांसह अन्य व्यावसायिकांनी देखील तीव्र विरोध सुरू केला आहे. शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची विविध संघटनां समवेत संवाद मोहीम सुरू आहे.
सर्वपक्षीय नगरसेवकांच्या वतीने महासभेत मंजूर करण्यात आलेला ठराव विखंडित करण्याची जाहीर मागणी काळे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. येत्या ३ डिसेंबर पर्यंत सदर ठराव विखंडित करण्यासाठी राज्य शासनाकडे मनपाने पाठवला नाही, तर ४ डिसेंबर पासून किरण काळे बाजारपेठेमध्ये एमजी रोड या ठिकाणी दोन दिवसीय धरणे आंदोलनास बसणार असल्याची माहिती ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा व काँग्रेस व्यापार, उद्योग आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष मनसुख संचेती यांनी दिली आहे.
याबाबत मनपा आयुक्तांना सोमवारी सकाळी लेखी निवेदन पाठवून शहर काँग्रेसने इशारा दिला आहे. याची प्रत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, आ. संग्राम जगताप, राज्याचे नगर विकास प्रधान सचिव, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देखील पाठवण्यात आली आहे. संचेती म्हणाले की, ३ डिसेंबर पर्यंत जास्तीत जास्त संघटनांपर्यंत पोहोचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. सगळ्यांचाच निर्णयाला विरोध आहे. काळे यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेस व्यापार, उद्योग आघाडी सर्वांना एकत्रित करण्याचे काम करीत आहे. कोणत्याही परिस्थिती व्यापाऱ्यांवरील हा अन्यायकारक निर्णय हाणून पाडला जाईल.
याबाबत अधिक माहिती देताना गुंदेचा म्हणाले की, या निर्णया वरून सर्व दुकानदारांमध्ये तीव्र संताप आहे. मात्र अद्याप पर्यंत कोणत्याच पक्षाच्या एकाही नगरसेवकाने यावर आपली भूमिका जाहीर केलेली नाही. मनपा अधिकारी दखल घेत नाहीत. नगरसेवक, अधिकाऱ्यांवर शहर लोकप्रतिनिधींचा दबाव आहे. व्यापाऱ्यांनी त्यांच्या दारात जावे. उंबरे झिजवावेत. मगच विचार करू अशी भाषा ते खाजगीत बोलू लागले आहेत. किरण काळे यांनी या विषयावर व्यापारी, दुकानदारांच्या मागे काँग्रेसची ताकद उभी केली आहे. लोकशाही आहे. हे संबंधितांनी विसरू नये. काळे हे व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी धरणे आंदोलनाला बसणार आहेत.
मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे म्हणाले की, बाजारपेठेतील चोऱ्यांवर अंकुश असावा यासाठी गंज बाजारातील बंद पडलेली पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओलांकडे यापूर्वीच केली होती.
पोलीसांनी सकारात्मक प्रतिसाद देखील दिला होता. बाजारपेठेत अजून एक नवीन चौकी सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांची देखील पोलिसांना मदत करण्याची तयारी होती. मात्र लोकप्रतिनिधींनी या कामात पडद्या आडून खोडा घातला. तो घातला नसता तर बाजारपेठेतील चोऱ्यांना अटकाव झाला असता. तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलिस निरिकक्षकांशी त्यांचे बीनसले आहे. सत्तेचा गैरवापर करून त्यांची बदली करण्याचा त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केला. मात्र त्याला वरिष्ठांनी दाद दिली नाही. म्हणून चोऱ्यांचे कारण पुढे करत उपोषणाची नौटंकी ते करत आहेत.
शहर लोकप्रतिनिधींचा पक्ष देशात, राज्यात आणि मनपात सत्तेत असून सत्तेचा संपूर्ण रिमोट कंट्रोल त्यांच्याच हातात आहे. खासदार, पालकमंत्री त्यांच्या खिशात आहेत. दोन-चार चोऱ्यांच्या विरोधात उपोषणाला बसणार म्हणणारे लोकप्रतिनिधी शहरातील ३५ ते ४० हजार व्यावसायिकांच्या गल्ल्यावर दिवसाढवळ्या टाकल्या जाणाऱ्या दरोड्यावर ब्र सुद्धा काढायला तयार नाहीत.
त्यांच्या पक्षाने महासभेत हा ठराव मंजूर केलाच कसा ? त्यांना खरंच व्यापारी, दुकानदार, बाजारपेठेची काळजी असेल तर त्यांनी बदलीसाठी उपोषणाची स्टंटबाजी करण्या ऐवजी किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलनामध्ये सहभागी व्हावे, असा टोला माजी नगरसेवक संजय झिंजे यांनी लगावला आहे.