
राज्यातील गणेश उत्सवाची सांगता झाली असली तरी पुणे आणि मुंबईतील गणेश विसर्जन मिरवणूक अद्याप सुरूच आहे. पुण्यातील मिरवणूक आणखी चार तास चालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक सुरूच आहे. ती आणखी चार तास चालण्याची शक्यता आहे. रात्रभर बाप्पाचा परतीचा प्रवास सुरू आहे. तरी देखील गणेश भक्तांमधील उत्साह कमी झालेला नाही.
- गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…अशा जयघोषात गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला आहे. मुंबईसह देशभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाची मिरवणूक गुरुवारी सकाळी 10 च्या सुमारास मंडपातून निघाली होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळी 8 वाजता हा राजा गिरगाव चौपाटीवर पोहचला. तिथे लाखोंच्या जनसमुदायाने हात उंचावून त्याचे दर्शन घेतले. त्यानंतर 9.15 वा. लालबागच्या राजाचे अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आले.
- तत्पूर्वी, लालबागच्या राजाचे विसर्जन पाहण्यासाठी चौपाटीवर लाखोंचा जनसमुदाय उसळला होता. किनाऱ्यावर बाप्पांची आरती करुन तराफा समुद्राच्या मध्यभागी नेण्यात आला. त्यानंतर पारंपारीक आणि आधुनिक पद्धतीची सांगड घालत बाप्पाला निरोप देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- बाप्पाला निरोप देताना कोळी बांधवच नाही तर आलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत सर्वांनी बाप्पाला निरोप दिला. काेळी बांधवांच्या बोटी बाप्पांसोबत समु्द्राच्या मध्यपर्यंत जाण्याची परंपरा आहे. कोळी समाजातील नागरिकांसाठी लालबागचा राजा आराध्य दैवत मानले जाते.
-
समुद्रात सध्या ओहोटी असल्याने गणपती बाप्पाच्या मूर्ती विसर्जनाच्या रांगेतच होत्या. अनेक मोठ्या मूर्तींचं विसर्जन बाकी होते. भरतीनंतरच सर्व मूर्ती विसर्जनासाठी मार्गस्थ झाल्या. दरम्यान मुकेश अंबानी यांनी लालबागच्या राज्याच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत दर्शन घेतले. त्यांच्याबरोबर अनेक गणेश भक्त बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आले आहेत.
परळचा राजा, खेतवाडीचा राजा चौपाटीवर
सध्या गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येने भाविक बाप्पांच्या विसर्जनासाठी पोहचले असून परळचा राजा, खेतवाडीचा राजा ही गणरायाची सर्वात उंच मुर्ती तसेच भायखळ्याचा विघ्नहर्ता यासोबतच इतरही परिसरातील स्थानिक गणपती गिरगाव चौपाटी येथे विसर्जनासाठी दाखल झाले आहेत. या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर काही वेळाने लालबागचा राजा, चिंतामणी तसेच गणेश गल्लीचा राजा हे विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पोहचतील. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले असून योग्य ती काळजी घेतली जात आहे. सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.