
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांची आज मंगळवार, २१ नोव्हेंबर रोजी ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहात जाहीर सभा होत असून या सभेआधी कल्याणहून ठाणे शहरात दाखल होणाऱ्या पाटील यांचा भव्यदिव्य रोड शो होणार आहे.
या अनुषंगाने शहरात वाहतूककोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने वाहतूक बदल केले आहेत.
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील चौकाचौकांत, मुख्य नाक्यांवर, रस्त्यांच्या दुतर्फा आणि गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या परिसरात सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी जोरदार बॅनरबाजी केली आहे. मनोज जरांगे-पाटील मंगळवारी ठाण्यात सभेसाठी येणार आहेत.
या सभेआधी त्यांचे ठाण्यात विविध ठिकाणी स्वागत केले जाणार आहे. त्यामुळे ठाणे शहरात होणारी संभाव्य कोंडी टाळण्यासाठी सकाळी सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत.
सभास्थळी दाखल होण्याआधी पाटील यांचे खारेगाव टोलनाका, माजिवडा, नितीन कंपनी, ठाणे महापालिका मुख्यालय येथे स्वागत होणार आहे.
तसेच, अल्मेडा चौक, वंदना सिनेमा मार्ग, गजानन महाराज चौक, पु. ना. गाडगीळ चौक, मुस चौक येथून मार्गस्थ होणारे पाटील तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गडकरी रंगायतन नाट्यगृह येथे सभेसाठी येणार आहेत. त्यामुळे ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी वाहतूक बदल जाहीर केले आहेत.