अहमदनगरचं नाव आहिल्यानगर झालं, व्हॉट्स ॲप स्टेटसमुळे तरुणावर हल्ला

अहमदनगरचे नाव अहिल्यानगर झाले, असे स्टेटस् व्हाट्स ॲपवर का ठेवले म्हणत तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१५) सायंकाळी एमआयडीसीतील हॉटेल रेजन्सीजवळ घडली.
याबाबत आर्यन देविदास शेवाळे (वय १८, रा. महादेव मंदिर, वडगाव गुप्ता शिवार) या तरुणाने फिर्याद दिली. एमआयडीसी पोलिसांनी ९ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.
संतोष विनोद शिंदे, अक्षय तांबे, भोऱ्या, वसिम, वसिमचा भाऊ व इतर चार अशा नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला. फिर्यादी आर्यन शेवाळे हा तरुण चेतना कॉलनी येथे मित्राच्या बहिणीच्या हळदी समारंभासाठी गेला होता.
हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर आर्यन दुचाकीने घरी जात असताना हॉटेल रेजन्सीजवळील मोकळ्या जागेत आरोपींनी त्याला अडविले. संतोष शिंदे याने आर्यन याला शिवीगाळ केली. अहमदनगरचे नाव अहिल्यानगर झाल्याचे स्टेटस का ठेवले, असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक मोंढे करीत आहेत.