ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

डॉक्टरांची धाव मुंबई, पुण्याकडे, ग्रामीण-निम शहरी मधील नागरिकांचे हाल, तज्ज्ञांचा सतत तुटवडा

मुंबई

ग्रामीण आणि निमशहरी भागातील सार्वजनिक वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभाग यासह बालरोग विभागामध्ये काम करण्यासाठी विशेष तज्ज्ञांचा सातत्याने तुटवडा असल्याचे दिसून येते.

याचे प्रमुख कारण म्हणजे वरिष्ठ निवासी डॉक्टर हे आजही ग्रामीण भागापेक्षा मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये काम करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे नांदेड, नंदुरबार, गोंदिया, बीड, छत्रपती संभाजीनगर येथे बाँड केलेल्या वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या रिक्त पदांची संख्या अधिक आहे.

वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षेनंतर एक वर्षाची बंधपत्रित सेवा देणे बंधनकारक आहे. या सेवेची पूर्तता न केल्यास ५० लाख रुपये इतकी दंडात्मक रक्कम आकारली जाते. ही रक्कम मोठी असल्याने तसेच पुढील सुपरस्पेशालिटी प्रशिक्षण घेण्याची तयारी करणारे वरिष्ठ निवासी डॉक्टर जागांची निवड करताना शहरांना प्राधान्य देताना दिसतात.

नांदेड येथे नुकत्याच झालेल्या रुग्णमृत्यूच्या गंभीर प्रकरणानंतर येथील रिक्त पदे आणि मनुष्यबळ तसेच औषधांच्या तुटवड्याचा गंभीर प्रश्न समोर आला. वैद्यकीय शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नांदेड येथे ९६ बंधपत्र सेवेच्या जागा ऑगस्ट महिन्यात रिक्त असल्याचे दिसते. त्यानंतर ४६ जागा भरल्या असून ५० जागा अद्यापही रिक्त आहेत.

मुंबई, पुणे येथील वैद्यकीय महाविद्यालयांमधील रिक्त जागांना तत्काळ प्राधान्य दिले जाते. राज्यात कुपोषण, मातामृत्यू, विविध प्रकारच्या आजारांचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या व रुग्णसंख्येचा भार सातत्याने वाढता असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागा मात्र मोठ्या संख्येने रिक्त राहतात. नांदेडमधील शासकीय रुग्णालयामध्ये झालेल्या रुग्णमृत्यू प्रकरणानंतर या प्रक्रियेतील जागानियोजनाचा गांभीर्याने विचार होण्याची गरज व्यक्त होत आहे.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातील (डीएमईआर) वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करोना संसर्गाच्या काळात श्वसनविकार, औषधे आणि अतिदक्षता विभागाच्या जागा वगळता इतर विषयांच्या जागा वाया गेल्या आहेत.

मुंबईत पालिका तसेच इतर सार्वजनिक रुग्णालयांमध्ये असलेल्या रिक्त पदांची संख्या मोठी असल्यामुळे येथील जागा ताबडतोब भरल्या जातात. त्यामुळे ‘डीएमईआर’ने योग्य पद्धतीने नियोजन केले तर वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या जागा ग्रामीण भागांतही तितक्याच तप्तरतेने भरल्या जाऊ शकतील, याकडे सार्वजनिक आरोग्यअभ्यासक विनोद शेंडे यांनी लक्ष वेधले.

शहरांतील रिक्त जागेसाठी आग्रह

काही वेळा वरिष्ठ निवासी डॉक्टर नांदेड, जळगाव, औरंगाबाद येथे प्रवेश घेतात आणि त्यानंतर तीन महिन्यांत शहरी भागातील रुग्णालयामध्ये जागा रिक्त झाली की तिथे बदली करून घेतात. ही पद्धतही योग्य नाही. पालिकेच्या व वैद्यकीय महाविद्यालयांतील जागांची उपलब्धता एकत्रित निघत असल्यानेही शहरांमध्ये इतर ठिकाणांपेक्षा अधिक रिक्त जागा दिसून येतात. पहिल्या फेरीमध्ये ज्यांना जागा मिळते, त्यातील काहीजण रुजू होत नाहीत. त्या जागेवर दुसऱ्या फेरीमध्ये प्रतीक्षायादीवर असलेल्यांची निवड केली जाते.

जिथे अतिरिक्त जागा आहेत, काही ठिकाणी अर्जांना प्रतिसाद मिळालेला नाही, अशा जागा गरज असलेल्या रुग्णालयांकडे वळवण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया सोमवारपर्यंत पूर्ण होईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे