वकील, डॉक्टर, विद्यार्थी, कार्यकर्त्यांचा रोष रस्त्यावर कामकाजावर बहिष्कार, तर कुठे रास्ता रोको
छत्रपती संभाजीनगर

मनसे – मनपाकडे मागितला हिशेब
प्रशासनाला नोटांचा आहेर, घोषणाबाजीने दणाणला परिसर
मराठवाडा मुक्तिदिन व मंत्रिमंडळ बैठकी निमित्त सुशोभीकरणासाठी शासनाने मनपाला ४० कोटी रुपये दिले. त्याचे नेमके काय केले, याचा हिशेब मनपा आयुक्तांनी द्यावा, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने क्रांती चौकात आंदोलन केले. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या पुतळ्यावर खेळण्यातील पैसे उधळले. शहर अध्यक्ष आशिष सुरडकर, गजानन गौडा पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
पुन्हा केली तीच कामे…
काही महिन्यांपूर्वी शहरात झालेल्या जी-२० परिषदेनिमित्त शहर सौंदर्यीकरणासाठी ५० कोटी रुपये दिले होते. या निधीतून जी कामे करण्यात आली तीच कामे पुन्हा या ४० कोटींच्या निधीतून करण्यात येत आहेत. मनपा उधळपट्टी करीत आहे, असा आरोप मनसेच्या नेत्यांनी केला. डॉ. शिवाजी कान्हेरे, प्रशांत अटोळे, विशाल बैद, रामकृष्ण मोरे आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले.
वकील – नवीन इमारतीत जाण्यास नकार
खंडपीठात नव्या इमारतीत फौजदारी प्रकरणांची सुनावणी करणारी न्यायालये हलवल्याने होणाऱ्या गैरसोयीमुळे खंडपीठातील वकील संघाने आजपासून कामकाजात सहभाग न घेण्याचे आंदोलन सुरू केले. यामुळे न्यायालयीन कामकाज ठप्प झाले. इमारत उभारताना कर्मचारी, वकिलांना विचारात घेतले नसल्याचा हा परिपाक आहे, असे वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. नितीन चौधरी यांनी सांगितले.
‘सुप्रीम कोर्टाचा अवमान’
कामकाजावर बहिष्कार हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान आहे. मुख्य न्यायमूर्ती शहरात आल्यानंतर या प्रश्नावर निर्णय घेण्यात येईल, अशा आशयाचे पत्र वकील संघाला दिले आहेे. तोडगा काढण्यासंदर्भात कुणीही संपर्क साधला नसल्याचे आणि कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय कायम असल्याचे वकील संघाचे अध्यक्ष अॅड. नरसिंह जाधव आणि सचिव अॅड. इंगोले यांनी सांगितले.
डॉक्टर – खा. पाटलां विरोधात आक्रमक
नांदेडमध्ये अधिष्ठातांना खासदार हेमंत पाटील यांनी शौचालय साफ करायला लावल्यामुळे घाटीत सर्व प्राध्यापकांनी पाटील यांच्याविरोधात आंदोलन केले. ही घटना अतिशय अवमानकारक असून राज्यभरात निषेध व्यक्त करण्यात येत असल्याचे वैद्यकीय शिक्षण संघटनेचे अध्यक्ष डॉ. भारत सोनवणे यांनी सांगितलेे. बुधवारी घाटीतील डॉक्टरांनी घोषणाबाजी करीत काळ्या फिती बांधून काम केले.
खासदारांवर कारवाई करा
वैद्यकीय क्षेत्रातील प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करणारी बाब आहे. ही घटना वैद्यकीय अध्यापकांच्या अस्तित्वाला काळिमा फासणारी आहे. त्यामुळे खासदार हेमंत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना करत असल्याचे डाॅ. सोनवणे यांनी सांगितले. या वेळी अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांना निवेदन दिले.
विद्यार्थी – खासगी करणा विरोधात निदर्शने
‘आरक्षण आता सारं संपणार, ठेक्यावर शिक्षण मिळणार’, ‘शिक्षणाचे बाजारीकरण करणाऱ्या सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वरती पाय’ आशा घोषणांनी औरंगपुरा चौक दणाणला. शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत ‘रास्ता रोको’ केला. अखेर पोलिसांनी बाजूला केले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, शहराध्यक्ष सुशील बोर्डे, भूषण तांबे, एनएसयूआयचे मोहित जाधव यांनी नेतृत्व केले.
कंत्राटी भरती रद्द करा
कंत्राटी पद्धतीने भरतीचा जीआर रद्द करावा, यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन केले. सर्व पेपरफुटी प्रकरणांची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करावी, ६२ हजार जिल्हा परिषद शाळांचे खासगीकरण करू नये आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या वेळी दीक्षा पवार, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे, शहराध्यक्ष खाजा शरफोद्दीन, सय्यद अक्रम आदींची उपस्थिती होती.