रामनवमीला रामलल्लाचा सूर्यकिरणांनी अभिषेक, भक्तांना 25 जानेवारीपासून दर्शन
नवी दिल्ली

१५ ते २४ जानेवारीपर्यंत कार्यक्रमांचे आयोजन
अयोध्येत बांधल्या जात असलेल्या तीनमजली राम मंदिराचा तळमजला डिसेंबरमध्ये तयार होईल. पुढील वर्षी २० ते २४ जानेवारीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. या पाच दिवसांपैकी एक तारीख पंतप्रधान कार्यालयाकडून निश्चित केली जाणार आहे.
श्रीराम मंदिराची भव्यता वाढवण्यासाठी मंदिराच्या शिखरावर विशेष डिझाइन उपकरण लावण्याचे काम सुरू असून, त्यामुळे दरवर्षी रामनवमीच्या दिवशी गर्भगृहात विराजमान असलेल्या रामलल्लाच्या मस्तकावर सूर्यकिरणे पडतील. मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, शिखरावर बसवण्यात येणारे हे उपकरण बंगळुरूमध्ये बनवले जात आहे.
दरम्यान, रामानंद संप्रदायाच्या नियमानुसार प्राणप्रतिष्ठा होईल. अन्न, जल, औषधी, फुलांचा त्यात वापर होईल. त्यापूर्वी ५१ इंच उंचीच्या बाल प्रतिमांना नगर परिक्रमा घडवून आणली जाईल.
राममंदिर आंदोलनातील लोकांना विशेष निमंत्रण
प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी १० हजार जणांची यादी तयार केली जात आहे, ज्यात साधू, संत, राम मंदिर आंदोलनाशी संबंधित लाेकांचा यात समावेश असेल. २२ जानेवारीला जेव्हा मुख्य समारंभ होईल तेव्हा मोठी गर्दी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे लोकांनी टीव्हीवर सोहळा पाहावा, असे आवाहन ट्रस्टने केले.
९०० कोटी खर्च झाले : मंदिराच्या बांधकामासाठी आतापर्यंत ९०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. तीनमजली भव्य मंदिराच्या बांधकामावर १८०० कोटी रुपये खर्च होतील.
मकरसंक्रांतीपासून १० दिवस प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम
प्राणप्रतिष्ठेसाठी १४ जानेवारी मकरसंक्रांतीपासून १० दिवसांचा अनुष्ठान कार्यक्रम व अभिषेक प्रक्रिया सुरू होईल. जाणकार संतांच्या सल्ल्याने प्राणप्रतिष्ठा सुरू केली जाईल. यासाठी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्यात आली आहे, जी याबाबत काम करत आहे.
रोज १ लाखापेक्षा जास्त श्रद्धाळू येतील, १५ ते २० सेकंदांत दर्शन घ्यावे लागेल
- २५ जानेवारीपासून तमाम भक्तांसाठी राम मंदिर खुले केले जाणार आहे. दररोज एक लाखापेक्षा जास्त भाविक अयोध्येत येण्याचा अंदाज आहे. भक्तांना दर्शनासाठी फक्त १५ ते २० सेकंदांचा वेळ मिळेल.
- ९९ कांस्यफलकांवर भगवान रामाचे जीवन, त्यांच्या कर्तव्याचे चित्रण साकारण्यात येत आहे.
- मंदिर किमान १ हजार वर्षे उभे राहील अशी डिझाइन केली आहे. बांधकामात लोखंडाचा वापर नाही. दगड जाेडण्यासाठी तांब्याचा वापर.
- राममंदिराचे बांधकाम २.५ एकरात होत आहे. परिक्रमा मार्गाचाही समावेश केल्यास परिसराचे एकूण क्षेत्रफळ आठ एकर एवढे असेल.
- मंदिराचे बांधकामाच्या वेळी तसेच एएसआयच्या खोदकामावेळी काही प्राचिन मूर्ती व कलाकृती मिळाल्या. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या परवानगीनंतर त्या वस्तू संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.