
नगर शहर व परिसरात शनिवारी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसानंतर मंगळवारी सायंकाळी शहर व परिसराला पुन्हा झोडपून काढले. नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावल्याने रब्बी हंगामाला काहीसा दिलासा मिळणार आहे. जून, जुलै व ऑगस्ट महिन्यातील बहुतेक दिवस कोरडे गेल्याने रब्बी हंगाम वाया गेला होता. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
शनिवारी नालेगाव, सावेडी सह शहरातील अनेक भागात अतिवृष्टीचा पाऊस झाला. शनिवारी चार तासात ११४ मिमी झालेल्या पावसामुळे दानादान उडाली होती. सर्वाधिक नालेगाव व सावेडी या परिसरात १६६ मिमी पावसाची नोंद झाली होती या अतिवृष्टीच्या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. रविवारी व सोमवारी देखील शहर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तुरळक प्रमाणात पावसाची नोंद झाली होती. मंगळवारी सायंकाळी पुन्हा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे गणेश मंडळ कार्यकर्त्यांचे मात्र हाल झाले. शहरातील प्रोफेसर कॉलनी परिसरात या पावसामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानाच्या परिसरात पाणी शिरले होते. त्यामुळे या चौकाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. वादळामुळे सावेडी परिसरातील एलआयसी कॉलनीत झाड उन्मळून पडले.