
करोनाचं संकट २०२० मध्ये जगभरात पसरलं. यामुळे जगात जवळपास २५ लाख जण मृत्यूमुखी पडले. महामारी सुरू असतानाच लसीवर संशोधन झालं. लसींचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यात आलं.
त्यामुळे महामारी नियंत्रणात आणण्यास मदत झाली. मात्र येत्या काळात आणखी एक महामारी येईल आणि ती करोनापेक्षा भयंकर असेल असा दावा युनायटेड किंग्डमच्या वैद्यकीय तज्ज्ञानं केला आहे. हा महामारीला डिझीज एक्स असं नाव देण्यात आलं आहे.
डिझीज एक्सचा प्रभाव, त्याची दाहकता १९१८-१९२० या कालावधीत आलेल्या स्पॅनिश फ्लू इतकी असेल, असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी डिझीज एक्सबद्दल सतर्कतेचा इशारा दिला आहे. या महामारीत करोनाच्या तुलनेत २० पट अधिक बळी जातील. मृतांची संख्या ५ कोटींच्या घरात असेल.
यूकेच्या वॅक्सिन टास्कफोर्सच्या अध्यक्ष असलेल्या डेम केट बिंघम यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिझीज एक्स कोविड १९ पेक्षा सातपट अधिक घातक असू शकतो. पुढील महामारी सध्या अस्तित्वात असलेल्या विषाणूपासून तयार होऊ शकते. यामुळे बहुतांश जणांना धोका असेल. शास्त्रज्ञ सध्या विषाणूंच्या २५ प्रकारांवर लक्ष ठेऊन आहेत. यातील प्रत्येक प्रकारात हजारो विषाणू आहेत. यातील कोणताही विषाणू गंभीर स्वरुपाची महामारी घेऊन येऊ शकतो. प्राण्यांच्या माध्यमातून विषाणू माणसांपर्यंत पोहोचू शकतो.
कोविडची लागण कोट्यवधींना झाली होती. पण यातील बहुतांश जणांनी कोविडवर मात केली. पण डिझीज एक्सचा मृत्यूदर इबोला इतका असेल. याशिवाय त्याच्या संक्रमणाचा दर गोवर इतका असेल.
गोवरच्या संक्रमणाचं प्रमाण ६७ टक्के आहे. जगात लवकरच कोणाला ना कोणाला तरी डिझीज एक्सची लागण होईल, अशी भीती डेम केट यांनी बोलून दाखवली.