ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम यांचे प्रशासनाला निवेदन – वस्त्रोद्योग धोरणात ठरल्यानुसार विणकरांना गणेशोत्सव भत्ता द्या
सोलापूर

राज्याच्या नव्या वस्त्रोद्योग धोरणात महिला कामगारांना १५ तर पुरुष कामगारांना १० हजार रुपयांचा उत्सव भत्ता आणि दोनशेपेक्षा अधिक युनिट मोफत वीज द्या, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन दिले.
हातमाग हा घरगुती व्यवसाय असून, त्यासाठी लागणारे भांडवल लाखाच्या घरात आहे. त्याच्या अभावी हातमाग कामगार मजुरीवर काम करतात. साधारणतः एका हातमागावर एक साडी तयार करण्यासाठी १० ते १५ दिवस लागतात. साडी निर्मितीची प्रक्रिया ही सूक्ष्म कलाकुसरीची आणि कौशल्याचे असते.
या कामात घरातील किमान चार व्यक्ती व्यस्त असतात आणि १५ दिवसांच्या कालावधीत एक नग साडी तयार होते. त्याची मजुरी ५ हजार रुपये मिळतात. या मजुरीत या कुटुंबांचा उदरनिर्वाह कसे होणार? असा प्रश्न आडम यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. हातमाग कामगारांच्या मुलांना शैक्षणिक सवलत, आर्थिक महामंडळाच्या सवलती मिळत नाहीत. सामाजिक सुरक्षाच नाही.
राज्य शासनाने २ जून २०२३ रोजी वस्त्रोद्योग धोरण राबवण्यास सुरुवात केली. त्याचा हातमाग कामगारांना लाभ द्या, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या शिष्टमंडळात कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे नेते अशोक इंदापुरे, वीरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्याळ, अॅड. अनिल वासम, अंबादास कुणी, राजू काकी, पांडुरंग काकी, सुरेश मादगुंडी, व्यंकटेश केंचुगुंडी, अंबादास मादगुंडी आदी उपस्थित होते.
गणेशोत्सवातच का?
गणेश चतुर्थीनिमित्त पैठणी साडी, हिमरू शॉल, घोंगडी, धोती आदी उत्पादन करणाऱ्या विणकर घटकांना लाभ देण्याचे ठरले. प्रमाणित आणि नोंदणीकृत विणकरांना गणेश चतुर्थीनिमित्त प्रती पुरुष विणकर १० हजार आणि महिला विणकरांना १५० हजार उत्सव भत्ता देण्यात येईल, असे जाहीर केले आहे. त्याचा लाभ तातडीने देण्यात यावा, असे त्यात म्हटले आहे.