श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर 35,000 महिलांनी केले अथर्वशीर्षाचे पठण
पुणे

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर 35,000 महिलांनी गणपती अथर्वशीर्षाचे पठण केले. दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आज सकाळी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर सकाळी 35,000 हून अधिक महिला त्यासाठी एकत्र आल्या होत्या. या महिलांनी एकत्र येऊन गणपती अथर्वशीर्षाचे पठण केले.
सध्या संस्थानामध्ये गणेशोत्सव सुरू आहे, त्याचाच एक भाग म्हणून मंदिर ट्रस्टच्या वतीने अथर्वशीर्ष पठाण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे 35,000 महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले. पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय झाले होते. गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी पहाटेच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली.
पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती. उत्सव मंडप आणि परिसर महिलांच्या शिस्तबद्ध रांगेने भरून गेला होता. महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत महिलांनी गणरायाला अभिवादन केले.