अहमदनगर शहरात तयार होणाऱ्या तालवाद्यांना राज्यासह देशभरातून मोठी मागणी
कॅलिफोर्नियातील मराठी बांधव नगरी तालवाद्यांच्या गजरात काढणार बाप्पाची मिरवणूक

लाडक्या गणरायाचे मंगळवारी होत आहे. दरवर्षी पारंपरिक वाद्यांच्या तालात गणरायाचे आगमन होते. गेल्या काही वर्षांपासून अनेक गणेश मंडळे डिजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या तालावर गणरायाच्या मिरवणुका काढत आहेत. अहमदनगरमध्ये तयार होणाऱ्या या वाद्यांना आतापर्यंत राज्यात ठिकठिकाणी मागणी होती. आता यंदा तर थेट अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील मराठी बांधव नगरी तालवाद्यांच्या गजरात गणरायाची मिरवणूक काढणार आहेत.
बाप्पांना वाजत-गाजत आणण्यासाठी नाशिकचे ढोल राज्यभर प्रसिद्ध होते. गणेशोत्सव मिरवणूक व ‘नाशिक ढोल’ हे समीकरण होते. मात्र गेल्या दशकापासून गणेशोत्सवात जोश आणण्यासाठी नगरकरांनी ढोल पथकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
शहराच्या तेजोमय संगीत परंपरेत भर घालणाऱ्या या ‘नगरी ढोल’ पथकांच्या तालावर राज्यातील गणेशभक्तांची पावले थिरकणार आहेत. शहरातील बापूराव भिकोबा गुरव ही फर्म गेल्या ५० वर्षांहून अधिक काळापासून तालवाद्यांची निर्मिती व विक्री करते. यांसह इतरही नामांकित फर्म शहरात आहेत.
नगरमध्ये ढोलच्या किमती बाराशे ते अडीच हजार रुपयांपर्यंत आहेत. ताशा अकराशे ते चोवीसशे रुपयांपर्यंत मिळतो. मागणीनुसार वर्षभर तालवाद्यांच्या निर्मितीचे काम अहोरात्र सुरू असते. गेल्या वर्षी गुरव यांच्या फर्मने तयार केलेली वाद्ये थेट इंग्लंडमध्ये गेली होती. यंदा कॅलिफोर्नियात राहणाऱ्या मराठी बांधवांनी महाराष्ट्रात विविध भागांत तालवाद्यांची चौकशी केली. मात्र त्यांना नगरी वाद्ये पसंत पडली.
तब्बल ८० वाद्यांची खरेदी
अमेरिकेतील कॅलिफॉर्निया प्रांतात मराठी बांधव पारंपरिक वाद्यांच्या तालावर गणेशोत्सव साजरा करणार आहेत. तेथील गणेशभक्तांनी तब्बल ४० ढोल, २० ताशे, १० झांजांच्या जोडाची खरेदी गुरव फर्ममधून केली आहे. काही दिवसांपूर्वीच ही पारंपरिक वाद्य विमानाने रवाना झाली. यामुळे नगरचे नाव सातासमुद्रापार गेले आहे.
कला जिवंत रहावी
आमची फर्म गेल्या ५० वर्षांहून अधिक काळापासून या व्यवसायात आहे. वाद्यांची गुणवत्ता टिकवून ठेवल्यामुळे आता परदेशातून मागणी आली आहे. हा आमचाच नाही, तर सर्व नगरकरांना मिळालेला सन्मान आहे. तालवाद्ये आपली संस्कृती व कलेचे प्रतिक आहेत. ही कला जिवंत रहावी, हीच अपेक्षा आहे. – देवदत्त गुरव, तालवाद्य विक्रेते, नगर.
वारीमध्येही नगरची वाद्ये
पंढरीच्या वारीसाठी नगरच्या टाळ, मृदंगांना मोठी मागणी असते. या वाद्यांची गुणवत्ता चांगली असल्याने हरिनाम सप्ताह, तसेच इतर धार्मिक कार्यक्रमांतही या वाद्यांना पसंती असते. यंदा सर्व पथकांच्या तारखा बुक आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व शिवजयंती मिरवणुकीतही या वाद्यांचा आवाज घुमतो.
यामुळे नगरी ढोल प्रसिद्ध
बापूराव भिकोबा गुरव ही फर्म गेल्या चार पिढ्यांपासून वाद्यांवर काम करते. हे महाराष्ट्रातील सर्वांत जुने दुकान आहे. ते स्वतः चमड्याची वाद्य बनवतात. त्यामुळे आवाजाचा गोडवा टिकून आहे. इतरांपेक्षा टिकाऊ आणि स्वस्त वाद्य असल्याने त्याला देशभर पसंती आहे. गुरव यांच्यासोबत इतरही दुकाने वाद्यांसाठी प्रसिद्ध आहेत.