ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगरच्या आडते बाजार चौकात सर्वच कार्यक्रमांना बंदी

शहरात राजकीय वर्चस्व वादातून एकाच ठिकाणी दोन-दोन गणेश मंडळांनी मंडप उभारणीसाठी दावे केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून तीन ते चार मंडळाचे वाद मिटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. यात आडते बाजार व्यापारी युवक मंडळ व भारत सहकार मित्र मंडळ यांच्यात वाद विकोपाला गेले. एकमत होत नसल्याने अखेर पोलिसांनी आडते बाजार चौक ही जागाच सील केली. यापुढे सर्वच कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.

स्वस्तिक चौक येथे राजयोग प्रतिष्ठान व जनजागृती मित्र मंडळ, आडते बाजार येथे व्यापारी युवक मंडळ व भारत सहकार मित्र मंडळ, झोपडी कॅन्टीन येथे अभिषेक कळमकर व गजेंद्र भांडवलकर, तसेच वैदुवाडी परिसरात मंडप उभारणीच्या परवानगीवरून वाद निर्माण झाले होते. त्यात आडते बाजार चौकातील वाद वगळता इतर ठिकाणी तोडगा निघाला आहे.

आडते बाजार चौकात दोन्ही मंडळांमध्ये तोडगा निघत नसल्याने अखेर पोलिसांनी दोघांनाही परवानगी नाकारली आहे. या चौकात पुढील काळात गणेशोत्सवासह शिवजयंती, दहीहंडी, नवरात्र उत्सव, हनुमान चालीसा, स्वातंत्र्य दिन व इतर कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम व महापुरुषांची जयंती साजरी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या दोन्ही मंडळाच्या प्रतिनिधींकडून तसे हमीपत्रही लिहून घेण्यात आले आहे. दरम्यान, या निर्णयानंतर एका गटाने हमीपत्रांचे फलक करून चौकात लावले होते. त्याची मोठी चर्चा नगर शहरात रंगली होती.

परवानगीसाठी धावपळ

मंडप उभारणीची परवानगी घेण्यापूर्वी मंडळाला धर्मादाय आयुक्त कार्यालयातून तात्पुरती नोंदणी घेणे बंधनकारक आहे. मात्र, या कार्यालयाकडून केवळ ऑनलाईन परवानगी दिली जात आहे. त्याचे संकेतस्थळ चार दिवसांपासून बंद आहे. ऑफलाइन परवानगी दिली जात नसल्याने कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे. महावितरण चे सर्व्हर डाऊन झाल्याने तात्पुरत्या वीज जोडणीसाठी मंडळांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे