
श्रीरामपूर येथील डाॅ चौथाणी हॉस्पिटललगतच्या जॉगिंग ट्रॅकवर तरुण दारू पिऊन धिंगाणा घालीत दहशत निर्माण करीत असल्याने फिरायला येणारे नागरिक तसेच महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. अशा तळीरामांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
काल सायंकाळी तीन तरुण दारूच्या नशेत तर्र होऊन ट्रॅकवर मध्यभागी उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्यांना अडथळा निर्माण करून शिवीगाळ करीत होते. तसेच हातात काठ्या घेऊन दहशत निर्माण करीत होते, तसेच महिलांना उद्देशुन अर्वांच्च भाषेत बोलत होते.
त्यामुळे फिरायला येणारे तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची कुचंबणा होत होती. असे प्रकार येथे वारंवार घडतात. त्याचप्रमाणे ट्रॅकवरून सर्रासपणे सायकली, मोटारसायकली वेगाने चालवून कसरती दाखविण्याचे प्रकार घडत असतात.
नागरिक फिरत असताना ट्रॅकवर मद्यपान करण्याचे प्रकारही खुलेआम घडतात. त्यांना कोणी समजुन सांगायला अथवा रोखायला गेल्यास ते दहशत निर्माण करून शिवीगाळ व दमबाजी करतात. असे प्रकार वारंवार घडत असल्याने नगरपरिषदेने नागरी सुविधा निर्माण करूनही येथे येणाऱ्यांची संख्या रोडावत आहे.
अशा प्रकारातुन काही अनर्थ घडण्याआधी पोलिसांनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा तात्काळ बंदोबस्त करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पालिकेनेही यावर निर्बंध घालुन अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्याचीही मागणी पुढे आली आहे.
शहर पोलिसांपर्यंत ही बातमी पोहोचल्याने पोलीस येण्याची वार्ता लागल्याने तोपर्यंत त्या तरुणांनी पलायन केले होते. काहींनी त्यांचे फोटोही काढल्याचे कळते.. पोलिसांनी सकाळ संध्याकाळ गस्त घालुन असे प्रकार बंद करावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.