
गेल्या पाच वर्षांपासून जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची बदली न करणे, नियम डावलून निधीसाठी कामांमध्ये, नावांमध्ये फेरफार करणे.
अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. निलेश भदाणे हे सन २०१८ पासून जिल्हा नियोजन विभागात जिल्हा नियोजन अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. गेल्या पाच ते साडेपाच वर्षांपासून शासनाने त्यांना एकाच पदावर, एकाच कार्यालयात नियुक्ती दिलेली आहे.
नियमानुसार शासनाने त्यांना अधिक काळ एका जागेवर न ठेवता इतरत्र बदली करणे अपेक्षित होते. मात्र, श्री. निलेश भदाणे हे अनेक वर्षांपासून एकाच जागेवर आहेत. तसेच, जिल्हा नियोजन विभागाकडून जिल्हाभरातील लोकप्रतिनिधी, जिल्हा वार्षिक योजना आराखडा व इतर विविध निधीचे वितरण केले जाते. या कामावर श्री. निलेश भदाणे यांचे नियंत्रण असते. नियोजन मंडळाने ज्या कामांसाठी निधी मंजूर केला, त्या ऐवजी नावांमध्ये फेरफार करून निधी दिला जाण्याचे प्रकार घडत आहेत.
जिल्हाधिकारी, प्रशासनातील इतर वरीष्ठ अधिकारी यांची दिशाभूल करून त्यांच्या अधिकार क्षेत्रात नसलेली मंजुरी देण्याचे प्रकार घडत आहेत. राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने व ठराविक नेत्यांच्या फायद्यासाठी हे प्रकार होत असताना, अनेक कामांच्या नावांमध्ये फेरफार होत असताना श्री. निलेश भदाणे याकडे सोयीस्कर डोळेझाक करत आहेत. अनेक वर्षांपासून एकच जागेवर असल्याने या विभागात त्यांनी मक्तेदारी असल्यासारखी मनमानी सुरू केली आहे. निधी वितरणाबाबत माहिती देण्यासही ते टाळाटाळ करतात.
अनेक वर्षे जिल्हा नियोजन अधिकारी या जिल्ह्यातील महत्त्वाच्या एकाच पदावर विराजमान असल्याने व त्यांनी राजकीय वरदहस्त मिळवल्याने स्थानिक अधिकारी त्यांना लगाम घालू शकत नाहीत. त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घ्यावी. नियमानुसार त्यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झालेला असल्याने त्यांची तत्काळ बदली करावी. त्यांच्या कार्यकाळात नियोजन समितीचे झालेले ठराव, निर्णय व त्यानुसार कामांना निधीवाटप झाले का, नियोजन समितीची मान्यता न घेताच परस्पर कामांची नावे बदलली का, जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी यावर आक्षेप का घेतले नाहीत व सर्वात महत्त्वाचे शासन त्यांची का बदली करत नाही, याचा खुलासा करावा व तत्काळ इतरत्र बदली करावी.
गिरीश जाधव
उपजिल्हा प्रमुख
शिवसेना (उद्धव ठाकरे)