
आगामी 2 दिवसांत मान्सूनची आस हिमालयाच्या पायथ्याकडून मूळ जागेवर सरकणार आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र निर्मिती होऊन ते वायव्येकडे भूभागावर सरकणार आहे.
त्यामुळे या दोन प्रणालींमुळे मंगळवार, 5 सप्टेंबरपासून पुढील 10 दिवस म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज आहे.
पश्चिम, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मध्यम ते मुसळधार तर मुंबईसह कोकण व विदर्भात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे. तथापि, मराठवाडा आणि विदर्भावर दुष्काळाचे सावट आहे. पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या असल्याचे चित्र आहे.
विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज
पुढील पाच दिवस राज्यात काही भागांमध्ये पाऊस जोरदार हजेरी लावणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तर विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज आणि उद्या विदर्भाच्या काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मान्सून परतणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
पुणे विभागात दोन दिवस यलो अलर्ट
उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत आहेत आणि या वाऱ्यांच्या प्रभावामुळे मंगळवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहेत.
यामुळे पुढील पाच ते सात दिवस पुणे परिसरात पाऊस कायम असण्याची शक्यता आहे. पुणे घाट विभागात दोन दिवस यलो अलर्ट असून मुसळधार पाऊस असणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.