
गणेशोत्सवाच्या काळात यंदा ४ दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दीड दिवसाच्या गणपती विसर्जानदरम्यान अर्थात २० सप्टेंबर, त्यानंतर पाचव्या दिवशी म्हणजे शनिवार, २३ सप्टेंबर, नवव्या दिवशी म्हणजे २७ सप्टेंबर आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी २८ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपर्यंत लाऊडस्पीकरसाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी दिली.
दरम्यान, आगामी दहीहंडी, गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यातील सर्वच ठिकाणच्या आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत, रस्त्यांची डागडुजी करुन घ्यावी. गणेश मंडळांना वीज जोडण्यांमध्ये उपलब्ध करुन द्याव्यात.
त्याचबरोबर आगमन व विसर्जन मार्गावर येणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी, रस्त्यात केबल येणार नाही याची दक्षती घ्यावी,असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले. समाज प्रबोधनाचा संदेश देतानाच पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. सह्याद्री अतिथीगृह येथे दहिहंडी व सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त सोमवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस अधिकाऱ्यांनी दहीहंडी, गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. त्यावर सकारात्मक पद्धतीने मार्ग काढावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
सुमारे 75 हजार गोविंदांना राज्य सरकारकडून विमा कवच
यंदा सुमारे ७५ हजार गोविंदांना राज्य शासनाच्या माध्यमातून विम्याचे सुरक्षा कवच देण्यात आले असून उर्वरित गोविंदांनाही विम्याचे सुरक्षा कवच देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. अनेक वर्षे सातत्याने गणेशोत्सवाचे आयोजन करीत असलेल्या मंडळांना एकाच वेळी पाच वर्षांसाठी परवानगी देण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. या वेळी पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे येथील अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
श्रीगणेशाची स्थापना १९ सप्टेंबर रोजीच
यंदा गणपती स्थापना ही अंगारक योगावर १९ सप्टेंबर रोजी करावी, असे आवाहन पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केले आहे. धर्मसिंधू, गणेश चतुर्थी निर्णयानुसार १८ सप्टेंबर रोजी तृतीया समाप्ती दुपारी १२.४० असून दुसऱ्या दिवशी चतुर्थी समाप्ती दुपारी १३.४५ वाजता आहे. वरील शास्त्रीय वचनाप्रमाणे १९ सप्टेंबर २०२३ रोजी चतुर्थी संपूर्ण मध्यान्हव्यापिनी असल्याने आणि मंगळवार असल्याने या दिवशी पंचांगात दिलेली श्रीगणेश चतुर्थी योग्य आणि महत्त्वाची आहे. यापूर्वी २६ ऑगस्ट १९९८ रोजी याच पद्धतीने निर्णय केलेला होता, अशीही माहिती दाते यांनी दिली.