पुणे एकवीरा देवी देवस्थानाच्या संचालकपदी राजकीय नेता नको
मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कार्ला येथील प्रसिद्ध एकवीरादेवी देवस्थानातील राजकीय साठमारीला चाप लावणारा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला आहे. या देवस्थानाच्या न्यासामधील दोन संचालकांची निवड करताना कोणतीही गुन्हेगारी व राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या आणि देवीचे खरे भक्त असलेल्याच दोघांची निवड व्हावी यादृष्टीने न्या. सुनील शुक्रे व न्या. फिरदोश पूनीवाला यांच्या खंडपीठाने स्पष्ट निर्देश दिले आहेत.
देवस्थानाच्या संचालक मंडळातील निवडणुकीवरून दोन गटांमध्ये वाद झाल्यानंतर पुणे सहायक धर्मादाय आयुक्तांकडून अंतिम अहवाल येईपर्यंत उच्च न्यायालयाने २०१८साली मंदिर न्यासावर प्रशासकीय मंडळ नेमले. त्यानंतर न्यायालयाचे अतिरिक्त रजिस्ट्रार यांना पर्यवेक्षक नेमून सहायक धर्मादाय आयुक्तांनी नेमलेल्या अधिकाऱ्यामार्फत संचालक मंडळावरील सात संचालकांची रीतसर निवड करण्यात आली.
या सात संचालकांकडून उर्वरित दोन संचालकांच्या पदांसाठी इच्छुक भक्तांकडून अर्ज मागवून त्यातून निवड केली जाते. त्याप्रमाणे सार्वजनिक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर ६०हून अधिक अर्ज आले.