मंगळागौर द्वारे संस्कृती जपण्यासोबतच बेटी बचाव अन् पर्यावरणाची जनजागृती
अहमदनगर प्रतिनिधी

दोन तास चालणाऱ्या या खेळात होते गाणी, उखाणे, खेळाचे सादरीकरण…
मंगळागौरच्या खेळातून संस्कृती जपण्यासोबतच मनोरंजन आणि बेटी बचाव, शिक्षण, पर्यावरण, प्रदूषण यांसारख्या सामाजिक विषयांवर गाणी, उखाणे विविध गीतांमधून शहरातील मंगळागौर महिला मंडळे जनजागृती करणार आहेत.
शहरात श्रावण सखी, राजलक्ष्मी ग्रुप असे अनेक ग्रुप आहेत. २५ ते ५२ वयापर्यंतच्या गृहिणी, नोकरदार महिला यात सहभागी आहेत.
मंगळागौरच्या एका ग्रुप मध्ये १२ ते १४ महिला असतात. मंगळागौरसाठी त्या दररोज दोन महिन्यांपासून दोन तास सराव करत आहेत.
दिवसाला चार ते सहा कार्यक्रम सादर करणार आहेत. आम्ही संस्कृती जपण्यासाठी मंगळागौरच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे, असे श्रावणसखी गृपच्या श्रिया देशमुख यांनी सांगितले. मंगळागौरचा खेळ दीड ते दोन तास चालतो. यात विविध खेळ, गाणी सादर केले जातात.
मंगळागौरच्या कार्यक्रमात आयोजकांच्या मागणीनुसार आम्ही बेटी बचाव, पर्यावरण संरक्षण यावर जनजागृती करतो, असे मंगळागौर कार्यक्रम सादर करणाऱ्या महिलांनी सांगितले.
नगरच्या महिलांना पुणे, श्रीरामपूर, बीड येथून मंगळगौर खेळ सादर करण्यासाठी बोलावले जाते. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटामुळे मंगळागौर ला मागणी वाढली आहे.
अर्थार्जन नव्हे, आनंदासाठी
मंगळागौर खेळातून अर्थार्जन मिळवणे हाच उद्देश नाही. आवड व आपली संस्कृती नव्या पिढीला माहिती व्हावी यासाठी काही वर्षांपूर्वी मंगळागौरीचे कार्यक्रम सादर करायला सुरुवात केली होती. यामुळे एकत्र येता येते, हसणं, खेळणं, गप्पा होतात. त्यातून ऊर्जा मिळते. या कार्यक्रमांतून मिळणाऱ्या मानधनाची रक्कम सदस्यांमध्ये वाटली जाते, असे गृपच्या महिलांनी सांगितले.
खेळ आणि व्यायाम
मंगळागौरनिमित्त मैत्रिणी जमतात, आपले अनुभव एकमेकांना सांगताना, गप्पा मारताना आणि मनोरंजन म्हणून मंगळागौरीचे खेळ व गाणी म्हणण्याची पद्धत आहे. हे खेळ म्हणजे शरीराला व्यायाम देणारे आहेत. ती एक प्रकारची आसनेच आहेत.
महिलांना घरातील कामांबरोबर मनोरंजन, आनंद मिळावा या हेतूने गाण्याची जोड देऊन हे खेळ खेळले जातात. यातून व्यायामही होतो. हे जिम्नॅस्टिकच आहे.
मानसी कोटस्थाने, कामिनी कुलकर्णी, अध्यक्ष राजलक्ष्मी गृप, केडगाव.
दिवसभरात दोन तासांचे सहा कार्यक्रम
मंगळागौरचे दिवसभरात सहा कार्यक्रम होतात. एक कार्यक्रम दीड ते दोन तासाचा असतो. आमच्या गृपमधील दोन तीन जणी सोडल्यास बहुतांश महिला पन्नाशीच्या आहेत. या सर्व महिला गृहिणी आहेत. मात्र पहिल्या कार्यक्रमाला जो उत्साह असतो, तोच शेवटच्या कार्यक्रमाला असतो. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनातून आमचा उत्साह वाढतो.
श्रिया देशमुख, अध्यक्ष, श्रावण सखी गृप.
पुणेकरांनाही भूरळ
केडगावातील राजलक्ष्मी गृपमध्ये १२ ते १४ नोकरदार महिला आहेत. सर्व महिला नोकरी, घर, संसार सांभाळून केवळ छंद म्हणून मंगळागौर करतात. आम्ही गेल्या सहा वर्षांपासून मंगळागौरचे कार्यक्रम करत आहोत.
यावर्षी आमचे ५ सप्टेंबर रोजी पुण्यात कोथरूड व नांदेड सिटी येथे दोन कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती वर्षा कुलकर्णी यांनी दिली.