
शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. पुण्यात कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे.
या गँगच्या दहशतीमुळे पुणेकर हैराण झाले आहेत. पोलिसांकडून या गँगच्या मुसक्या आवळणे सुरू आहे. अशातच पुणे शहराला चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे.
एकीकडे नागरिकांवर होणारे हल्ले, दरोडे, घरफोडी, चोरी यामुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. यातच आता पुणे शहर ड्रग्ज माफियाच्या विळख्यात सापडतंय की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, पुणे पोलिसांनी एका कारवाईत ड्रग्स माफियांच्या टोळीचा जेरबंद केले आहे.
पोलिसांनी ड्रग्ज माफियांकडून १ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केलं असून ३ जणांना अटक करण्यात आली आहे. सुमेर जयरामजी बिष्णोई, चावंडसिंग मानसिंग राजपूत, लोकेंद्रसिंह महेंद्रसिंग राजपूत असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ही टोळी राजस्थानची असल्याची माहिती आहे. कात्रज भागात ही कारवाई करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी कात्रज कोंढवा रोडवर छापा टाकला. पोलिसांनी या कारवाईत सुमेर बिष्णोई याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी ६४ लाख २८ हजार रुपये किमतीचे ३ किलो २१४ ग्रॅम अफीम जप्त केले.