
राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यानंतर पवार कुटुंबीयातून रोहित पवार भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत आलेले आहेत. पुण्यापाठोपाठ आता जामखेडमध्येही राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत.
आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर आणि केकवर त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे. सध्या हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
दोन दिवसांपूर्वी पुण्यातही बॅनर
दोन दिवसांपूर्वी मावळ, त्यानंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावरही असाच पद्धतीने बॅनर लागले होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार रोहित पवार आक्रमक झालेले दिसत आहेत..
बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने आता रोहित पवारांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी जबाबदारी आहे. जामखेड येथील कार्यक्रमाप्रसंगी कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवार भावी मुख्यमंत्री असे लिहलेला केक या ठिकाणी आणला गेला. यावर शरद पवार यांचा फोटो तर मंत्रालयाचाही फोटो होता.
होर्डिंगची रंगली चर्चा
राष्ट्रवादीतून सुरुवातीला अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री असे बोर्ड लावले होते. त्यावर संख्याबळ नसल्याने मुख्यमंत्री होऊ शकत नाही असं सांगत अजित पवारांनी असे बोर्ड लावू नयेत अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यालयाजवळ सुप्रिया सुळे यांचाही अशाच पद्धतीने बोर्ड लावण्यात आला होता. त्याच्यानंतर आमदार जयंत पाटील यांचेही भावी मुख्यमंत्री असे बोर्ड झळकले होते. आता दुसऱ्यांदा आमदार रोहित पवारांचा उल्लेखही त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून केला आहे. याची चर्चा मात्र जोरदार सुरू आहे.
तटकरेंनी केली रोहित पवारांवर टीका
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी रोहित पवारांवर टीका केली होती. कितीही जन्म घेतले तरीही रोहित पवार हे अजित पवार होऊ शकणार नाही असं सुनील तटकरे म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, मला अजितदादांसारखं व्हायचं नाही. अजित पवार हे मोठे नेते आहेत. मी राजकारणात आलोय ते नेता बनण्यासाठी नव्हे तर विचार जपण्यासाठी आहे.