ध्येयवेड्या शिक्षकाने गुंतवणूक करत पालटलं शाळेचं रूपडं

बदलत्या शैक्षणिक प्रवाहात खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षक अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. अनेक ठिकाणी डिजिटल क्लासरूमबरोबरच शैक्षणिक सुविधांसाठी स्वतः शिक्षक आर्थिक मदत करीत आहेत. कौळाणे (ता. मालेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेबाबतही असेच म्हणता येईल.
ध्येयवेड्या सुयोग बाविस्कर या शिक्षकाने लाख रुपयांची गुंतवणूक करत शाळेचं रूपडं पालटलं आहे. इतर कुठलाही आर्थिक आधार न घेता त्यांनी शाळेचे ऐतिहासिक किल्ल्यासारखे प्रवेशद्वार साकारून स्वराज्याच्या पाऊलखुणा जपण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवकालीन इतिहास व आकर्षक चित्रे असलेल्या बोलक्या भिंती रंगविण्यात आल्या आहेत. शाळेला गडकिल्ल्यांचे स्वरूप देण्यात आले आहे. वर्गखोल्यांना किल्ल्यांची नावे दिली आहेत.
ऐतिहासिक प्रवेशद्वार तोफांनी सज्ज झाले आहे. शाळेतील भिंतीसुद्धा महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आहेत.प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार वर्गात अध्यापन केले जाते. सर्वच विद्यार्थी वाचन व गणन क्रिया करतात. शिक्षकांचे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष असल्याने मुलांची उपस्थिती शंभर टक्के असते.
शिवाजी शहाजी भोसले (SSB) ही विद्यार्थ्यांची बचत बँक विद्यार्थ्यांमधून नेमलेल्या मॅनेजर व कॅशिअर यांच्याकडून चालविली जाते.
स्वतंत्र मोहोरबंद शिक्का, Bank opening फाॅर्म deposite स्लिप, withdrawl स्लिप, Passbook यांचा वापर केला जातो.
विशेष आकर्षण म्हणजे ‘ATM machine आहे. ई-लर्निंग वायफायची सुविधा, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीच्या दृष्टीने स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ दाखविले जातात.
शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे विद्यार्थ्यांना सुरक्षितता पुरविण्यात आली.
शिक्षिका संगीता पाटील यांच्या सांस्कृतिक योगदानामुळे अध्यक्ष करंडक स्पर्धेत चमकदार कामगिरी दाखवत मालेगाव गटाचे प्रतिनिधित्व केले आहे. कमीत कमी मजुरी लागावी म्हणून शाळेतीलच शिक्षक वर्ग सांभाळून काम करतात. शिक्षक धीरज मोरे स्वतः श्रमदानातून परसबाग फुलवतात.
परसबागेत वांगी, टोमॅटो, बटाटे, गिलके, कारले, फ्लॉवर आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. झेंडू शेतीचे क्विंटलभर उत्पन्न काढले जाते. शहरापासून ३५ किलोमीटरवर असलेल्या माळरानावर फुलविलेला ज्ञानाचा मळा प्रसिद्धीपासून कोसो दूर आहे. स्वतः पदरमोड करून हे वैभव निर्माण करत अनेकांसाठी नवी ऊर्जा ठरणार आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांनीही या शाळेतील शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.पर्यावरण व कृतिशीलता -▪️सीडबॉल, एक झाड लेकीचे उपक्रम.▪️ सलग सहा वर्षांपासून २५ हजार झाडे लावली.▪️ ठिबक सिंचनाद्वारे वृक्षसंवर्धन.
उत्पादक उपक्रमदप्तरमुक्त शनिवार या उपक्रमात जास्तीत जास्त उत्पन्न प्राप्त होऊ शकतील, असे उपक्रम घेण्यात येतात. गोणपाट, पत्रावळी, कागदी पिशव्या, राखी, पतंग, आकाशकंदील, पणती व गणेशमूर्ती बनवणे कार्यशाळा घेतल्या जाऊन वस्तूंची बाजारात विक्रीही केली जाते.
शाळेचा आकर्षक हॉल असून, शंभर विद्यार्थी त्यात बसू शकतील. त्यात ग्रंथालय व प्रयोगशाळा चालविली जाते. शाळेने गांडूळ खत प्रकल्प सुरू केला असून, कंपोस्ट व गांडूळ खत तयार केले जाते.”बदल करण्याचा मनाचा ठाम विश्वास स्वस्थ बसू देत नाही. आम्ही तीनही सहकारी कुठल्याही वेळ व काळाची पर्वा न करता शाळेच्या कामात झोकून देतो. शाळा हे घर व संस्काराचे मंदिर वाटावे असेच काम सदोदित चालू राहील.” – सुयोग बाविस्कर, मुख्याध्यापक, जि. प. शाळा कौळाणे गा.