घरगुती देखावाच्या माध्यमातून श्रीकांत आडेप यांनी मांडली चंद्रयान 3 ची यशोगाथा
अहमदनगर प्रतिनिधी

गणपती हा उत्सव घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. वेगवेगळ्या पद्धतीने गणरायाचं स्वागत करण्यात येतो.
एकदंत कॉलनी, दातरंगे मळा येथील रहिवासी श्रीकांत आडेप हे दरवर्षी घरगुती गणेशोत्सव अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा करून सामाजिक संदेश देणारे घरगुती देखावा सादर करतात.
यावर्षी चंद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं आहे. असं करणारा भारत जगातला पहिलाच देश ठरला आहे. आतापर्यंत कुणालाही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करण्यात यश आलेलं नाही. आतापर्यंत जगातल्या फक्त 4 देशांना चंद्रावर लँडिंग करण्यात आलं आहे. हाच विषय घेऊन गणपती समोर ‘चंद्रयान 3 यशोगाथा’ हा देखावा त्यांनी सादर केला.
या देखावा मध्ये विक्रम लँडरची प्रतिकृती व 4 फुटी चंद्रयान रॉकेट दाखवण्यात आले आहे. तसेच चंद्रयान -3 साठी ज्यांचे ज्यांचे योगदान आहे त्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फोटो आणि त्यांनी केलेले काम याचे माहिती फलक व पृथ्वीचे व चंद्राचे आकर्षक असे चित्र फलक दाखवण्यात आले आहे. तसेच विक्रम लँडरमधून बाहेर आलेल्या प्रज्ञान रोवरच्या चाकाचे निशाणही दाखवून प्रज्ञान रोवरवर आकर्षक गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
अतिशय सुंदर पद्धतीने या देखाव्याची मांडणी करण्यात आली असून देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे.
यावेळी श्रीकांत आडेप म्हणाले की, देशाच्या नावलौकिक वाढवण्यासाठी भारतातील नागरिक नेहमीच तत्पर असतात. चंद्रयान – 3 यशस्वीरित्या लँडिंग झाल्यामुळे भारताचे नाव आज पूर्ण देशांमध्ये झळकत आहे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचे काम अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे, त्यांच्या कौतुकासाठी आणि परिसरातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना, महिलांना परिपूर्ण माहिती मिळावी या उद्देशाने ‘चंद्रयान-3 यशोगाथा’ हा घरगुती देखावा सादर केला आहे.
यावर्षी दररोज सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती व सरकारी क्षेत्रातील नवयुक्त अधिकारी यांच्या हस्ते गणरायाची महाआरती करण्यात येत आहे. मागच्या वर्षी साईबाबा मंदिर देखावा सादर करण्यात आला होता.
चंद्रयान – 3 यशोगाथा देखावा सादर करण्यासाठी त्यांना मुलगी सृष्टी, पत्नी सपना व मित्र अमोल गाजंगी, निलेश चित्राल,श्रीकांत इराबत्ती व महेश कांबळे या सर्वांची हा देखावा करण्यास मदत केली आहे.