
जिल्ह्यात सात दिवसात रुग्णसंख्येत मोठी वाढ..
अहमदनगर जिल्ह्यात डोळे येण्याच्या आजाराचा झपाट्याने संसर्ग होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने एक ऑगस्टपासून सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली असून सात दिवसात ग्रामीण भागात 2,277 जणांचे डोळे आलेले रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यभरात डोळे येण्याची साथ झपाट्याने पसरत आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्येही कंजक्टिव्हिटीज म्हणजेच डोळे येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने १ ऑगस्ट पासून ग्रामीण भागात डोळे येणाऱ्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर आशा वर्कर मार्फत हा सर्वे केला जात आहे.
जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे म्हणाले, डोळे येण्याची साथ पसरत आहे परंतु रुग्णांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. लक्षणे दिसून आल्यास संबंधित व्यक्तींनी गर्दीत जाणे टाळावे तसेच तत्काळ उपचार घ्यावेत. शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये एप्लीकॅप निंबोळी ट्यूब तसेच डोळ्यांसाठी आवश्यक ड्रॉप्स उपलब्ध आहेत. नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेतून उपाय योजना हाती घेण्यात आले आहेत, असे सांगितले.
नगर मनपा हद्द 63, अकोले 314, जामखेड 76, कर्जत 125, कोपरगाव 61, नगर 39, नेवासे 157, पारनेर 242, पाथर्डी 102, राहता 159, राहुरी 96, संगमनेर 456, शेवगाव 20, श्रीगोंदे 91, श्रीरामपूर 276 डोळे आलेले रुग्ण आढळून आले आहेत. तर 593 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.