तौरल इंडिया – सुपा प्लांटचे भव्य उद्घाटन. उद्योजकांना त्रास देणार्यांना ठोकून काढणार.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
सुपा

औद्योगिक क्षेत्रात झुंडशाही व गुंडशाही खपवून घेतली जाणार नाही. सुपा औद्योगिक क्षेत्राची वेगाने वाढ होत असताना काही घटक उद्योजकांना त्रास देण्याचे प्रकार करत असल्याची माहिती मिळाली आहे. हे अजिबात सहन केले जाणार नाही. अशा घटकांना ठोकून काढले जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

मात्र, ठोकून काढणे म्हणजे कायद्याच्या चौकटीतच कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा (ता. पारनेर) औद्योगिक क्षेत्रातील तौरल इंडिया या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दि.8) झाले.


तौरल इंडियाचा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. स्वतंत्र व आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या वस्तूंची आपल्याला आयात करावी लागते, त्याला सक्षम पर्याय देशातच निर्माण करणे ही काळाची गरज आहे. परदेशातून आयात कराव्या लागणाऱ्या गोष्टी आता भारतात व विशेषतः महाराष्ट्रात भरत गीते यांच्यासारख्या उद्योजकांमुळे तयार होत आहेत, ही अभिमानाची बाब आहे.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, आ. काशिनाथ दाते, आ. विक्रम पाचपुते, महंत नामदेव शास्त्री, महंत शिवाजी महाराज, तौरल इंडियाचे प्रमुख भरत गिते उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागरिकांना उद्योगांकडून काही अडचणी असतील तर त्यांनी अधिकृत यंत्रणेकडे तक्रार करावी. मात्र, उद्योगांना दिला जाणारा बेकायदेशीर त्रास खपवून घेतला जाणार नाही. सुपा औद्योगिक क्षेत्रात नवीन उद्योग येत असताना येथे काही वाईट ‘उद्योग’ ही निर्माण होत असल्याची माहिती आहे. अशा घटनांकडे कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत गांभीर्याने पाहिले जाईल. जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
‘इज ऑफ डुइंग बिझनेस’, उत्पादन खर्चातील सुलभता आणि मजबूत कायदा-सुव्यवस्थेमुळे महाराष्ट्रात उद्योगवाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर औद्योगिक क्षेत्रातील अगदी लहान घटनाही गंभीर मानून त्यावर तातडीने कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्रात उद्योगवाढ होत असताना पर्यावरणाचे संरक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे. उद्योग पर्यावरणपूरक असले पाहिजेत. उद्योगवाढ आणि पर्यावरण यांचा समतोल साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यापूर्वी उद्योगवाढ प्रामुख्याने मुंबई-पुणे पट्ट्यात मर्यादित होती.
आता उद्योगांचे विकेंद्रीकरण सुरू करण्यात आले असून राज्याच्या प्रत्येक भागात उद्योग पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याचा सरकारचा प्रयत्न असून उत्पादन क्षेत्र अर्थव्यवस्थेचा कणा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, दावोस गुंतवणूक परिषदेनंतर सरकार काय करते? याचे उत्तर सुपा औद्योगिक क्षेत्रातील तौरल इंडिया या एका वर्षातच उत्पादन सुरू झालेल्या प्रकल्पाने दिले आहे.
विशेष म्हणजे हा प्रकल्प एका मराठी उद्योजकाने उभारला आहे. तौरल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गीते यांनी प्रकल्पाची माहिती देताना 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून 1,200 जणांना थेट रोजगार उपलब्ध झाल्याचे सांगितले.

राज्याच्या औद्योगिक प्रगतीचा समतोल राखण्यावर शासनाचा भर आहे. पूर्वी राज्याची औद्योगिक प्रगती केवळ मुंबई, एमएमआर व पुणे या भागांपुरती मर्यादित होती. ती विकेंद्रित करून राज्याच्या सर्व भागांत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सुपा एमआयडीसी हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे.
केवळ सामंजस्य करार करून न थांबता, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी उद्योग विभाग तत्परतेने काम करत आहे. दावोसमध्ये २०२५ मध्ये करण्यात आलेला करार अत्यंत वेगाने प्रत्यक्षात आला आहेत.
केवळ उद्योग उभारणे पुरेसे नाही, तर ते पर्यावरणपूरक असणे आवश्यक आहे. या प्रकल्पात ‘सस्टेनेबल कास्टिंग’ व ‘रिसायकलिंग’वर भर देण्यात आला असून, राज्यात ‘उद्योग व पर्यावरण’ हातात हात घालून पुढे जातील, असा विश्वास आहे.
हेलिकॉप्टर, जहाजे आणि रस्ते बांधणीसाठी लागणारे अद्ययावत भाग आता अहिल्यानगरमध्ये तयार होत आहेत, ही अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.




